सोलापूर शहरातील एका खाजगी रुग्णालयात रुग्णाचा GBS मुळे मृत्यू
दूषित पाण्यामुळे आणि दूषित अन्नामुळे GBS आजाराची लागण
![Solapur, city, private, hospital, patient, GBS death,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/gbs-780x470.jpg)
सोलापूर : सोलापूर शहरातील एका खाजगी रुग्णालयात गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. जीबीएस आजारामुळे त्या रुग्णाचा मृत्यू झाला अशी शंका व्यक्त होत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, संबंधित रुग्ण हा पुणे येथील होता. त्याचे मूळ गाव सोलापूर होते. जानेवारी महिन्याच्या पाहिल्या आठवड्यात हा रुग्ण जत्रेकरिता सोलापुरात आला होता. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे. GBS आजारामुळेच त्याचा मृत्यू झाला आहे की नाही, याबाबत अजून पोस्टमार्टम अहवाल आलेला नाही. परंतु लक्षणे तर GBS आजारासारखी दिसत होती.
डॉक्टरांनी पुढे सांगितले की, हा संसर्गजन्य आजार नाही. दूषित पाण्यामुळे आणि दूषित अन्नामुळे GBS आजाराची लागण होऊ शकते. वेळेत उपचार घेतल्यास रुग्ण बरा होऊ शकतो, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी दिली आहे.
आरोग्य यंत्रणा सज्ज; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून चाचणी सुरू
सोलापूर जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत चाचणी सुरू करण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील विशेष पथक सोलापूर जिल्हा आरोग्य यंत्रणेने सज्ज ठेवले आहे. पुणे जिल्ह्यात या जीबीएस आजाराचा शिरकाव झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक लोक पुण्यात वास्तव्यास आहेत. विशेषकरून पुण्याहून आलेल्या रुग्णांची तपासणी केली जाणार आहे.
हेही वाचा : जवानांच्या जीवनावर आधारित नाटिकेने उपस्थितांना अश्रू अनावर!
हातापायाला मुंग्या, श्वास घेताना अडचण अन्… GBS आजारांची लक्षणे काय?
गुलियन बॅरी सिंड्रोमच्या म्हणजेच (GBS) रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. पुण्यात GBSची लागण झालेल्या सोलापुरातील हत्तुर या गावातील तरुणाचा सोलापुरात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. स्वच्छता, शुद्ध पाणी, शिळे खाणे टाळल्यास आणि आरोग्यदायी आहार घेतल्यास (GBS) गुलियन बॅरी सिंड्रोम आजार बरा होऊ शकतो. या आजारापासून स्वतःचे संरक्षण करता येऊ शकते . GBS या आजाराची लागण झाल्यानतंर शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मज्जासंस्थेवर हल्ला करते. त्यामुळे थकवा किंवा हातापायाला मुंग्या येणे, झिणझिण्या येणे, अचानकपणे चालताना त्रास होणे, शरीर कमजोर झाल्यासारखे वाटणे, खूप दिवस डायरियाचा त्रास होणे किंवा लकवा मारणे अशी लक्षणे आहेत. GBS आजार कोणत्याही वयातील व्यक्तींना होतो. दररोज पिण्याचे पाणी बदलावे. तसेच पाणी उकळून प्यावे. यासोबतच नेहमी स्वच्छ आणि ताजे अन्न खावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले यांनी केले आहे.