महिन्याभरात मोठा राजकीय भूकंप? संजय शिरसाटांचा मोठा दावा

मुंबई | विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. यानंतर महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी एक मोठा दावा केला आहे. महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळणार असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. तसेच, ठाकरे गटाचे सर्व खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा शिरसाट यांनी केला आहे.
संजय शिरसाट म्हणाले, की राजकारणात अशा प्रकारे जे प्रवेश होतात त्यांचे नावं ऐनवेळी जाहीर केले जातात. मात्र, ही वस्तुस्थिती आहे की सर्व खासदार आमच्या संपर्कात आहेत. ठाकरे गटाने किती काहीही बोललं तरी त्यांना संपर्क करायचा तो संपर्क करत असतो. कारण पाच वर्ष विरोधात राहून काय करणार? त्यांचं उद्याचं भविष्य काय? उद्या काय घडणार हे देखील माहिती नाही. त्यामुळे सत्तेत राहिलं तर मतदारसंघासाठी कामे चांगले होतील. एवढंच नाही तर चांगलं स्थानही त्यांना मिळू शकतं. त्यामुळे सर्वजण आमच्या संपर्कात आहेत.
हेही वाचा : पुण्यातील पुष्प प्रदर्शनाची परंपरा युवकांनी जपावी; सुहास दिवसे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ठाकरे गटाचे खासदार संपर्कात आहेत. मात्र, यासंदर्भातील निर्णय कधी घ्यायचा हे उपमुख्यमंत्री शिंदे ठरवतील. निर्णय लवकरच होईल, खूप जास्त वेळ यासाठी लागणार नाही. अशा प्रकारची अवस्था फक्त ठाकरे गटातच नाही, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत देखील आहे. महिन्याभरात राजकारणाला वेगळी कलाटणी नक्कीच मिळेल, असं संजय शिरसाट म्हणाले.
ठाकरे गटाचे काही आमदारही संपर्कात : संजय शिरसाट
ठाकरे गटाचे किती खासदार संपर्कात आहेत याचा आकडा आत्ता सांगता येणार नाही. पण जेवढे खासदार आमच्या पक्षात येण्याच्या प्रयत्नात आहेत तेवढे येतील. काही गोष्टी आम्हाला देखील माहिती नसतात. त्यामुळे ठाकरे गटाचे किती खासदार येणार याची संख्या फक्त एकनाथ शिंदे यांनाच माहिती आहे. त्यामुळे एक महिन्यांत अनेक खासदारांचा प्रवेश होईल. ३१ जानेवारीला संसदेचं अधिवेशन सुरु होईल. त्यानंतर या सर्व घडामोडी घडतील आणि अधिवेशन संपेपर्यंत सर्व सोक्षमोक्ष लागेल. तसेच ठाकरे गटाचे काही आमदारही संपर्कात आहेत, काही माजी आमदार संपर्कात आहेत. काही पदाधिकारी आहेत. ठाकरेंच्या पक्षात जे कंटाळले आहेत ते सर्व आमच्या संपर्कात आहेत, असंही संजय शिरसाट म्हणाले.




