अहो, एकनाथराव,काय चाललंय राव !
![Hey, Eknathrao, chali, Rao,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/shinde-780x470.jpg)
महाराष्ट्रात ‘महायुती’ चे सरकार सत्तेवर आल्यापासून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काहीतरी बिनसले आहे. एक तर त्यांनाच पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे होते, ते झाले नाहीत. त्यानंतर गृहमंत्रीपदाची त्यांची मागणी होती, ती पण पूर्ण झाली नाही. त्यांच्या मंत्र्यांना अपेक्षित खाती मिळाली नाहीत, या मुद्द्यावर रुसून बसण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय राहिलेला नाही.. किंबहुना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो ठेवलेला नाही.
भरभरून दिले की राव..
तसं पाहिलं तर गेली अडीच वर्षे राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवताना एकनाथ शिंदे यांना कसलीच आडकाठी आली नव्हती. भारतीय जनता पक्षाबरोबर युती असताना आणि भाजपाचे जास्त सदस्य असतानाही एकनाथरावांच्याकडे मुख्यमंत्रीपद गेले. वास्तविक, या पदावर देवेंद्र फडणवीस बसणे अपेक्षित होते. पण, तेव्हा सर्व फासे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने पडले.
थोडीशी पार्श्वभूमी पाहिली तर , भाजपाला उद्धव ठाकरे यांनी दगा दिल्यानंतर भाजपाने म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांनी ताकद दाखवली आणि शिवसेनेत उभी फूट पडली. बरोबर चाळीस आमदार घेऊन आलेल्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद बहाल करण्यात आले आणि उद्धव ठाकरे यांचा काटा काढण्यात आला. कालांतराने न्यायालयीन खटला चालला, त्यात शिंदे यांचा गट अधिकृत पक्ष झाला, आणि त्यांचे धनुष्यबाण हे चिन्हही एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाले तीच अधिकृत शिवसेना ठरली !
या दोघांची युती असतानाच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आणि या युतीमध्ये सामील होऊन ‘महायुती’ झाली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री बनले. परंतु, एकनाथ शिंदे यांचा राज्य कारभार मनसोक्त चालला. त्यात सीनियर असूनही अन्य दोघांचा हस्तक्षेप कधीच नव्हता. एवढेच काय, दिल्ली सुद्धा त्यात मध्ये पडत नव्हती आणि एकनाथ शिंदे च्या पाठीशी भक्कम होती !
हेही वाचा : महारेराकडून ग्राहकांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जारी
निवडणुकांमध्ये प्रचंड कौल
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ‘महायुती’ मधील तिन्ही पक्षांना प्रचंड कौल मिळाला आणि मोठा पक्ष असल्यामुळे साहजिकच भाजपाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले. अर्थातच एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले, त्यांच्यापुढे दुसरा पर्यायच ठेवला नाही आणि आता या कालखंडात प्रत्येक वेळी आपल्याला विश्वासात घेतले नाही, फडणवीस यांनी साईड ट्रॅक केले, अशी काहीशी भावना एकनाथरावांची झाली आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी त्यांना डावलण्यात आल्याचे, त्यांचे किंवा त्यांच्या साथीदारांचे म्हणणे असते. पण, सध्या समोर काहीच पर्याय दिसत नाही. नाक-तोंड दाबून मुख्यांचा मार, अशी अवस्था एकनाथरावांची झाली असल्यामुळे सध्याच्या राजकारणात उलट सुलट चर्चांना उघाण आले आहे. नाशिक आणि रायगड येथील पालकमंत्रीपदाला स्थगिती आल्यामुळे हा विषय आणखी गूढ बनला आहे, हे मात्र नक्की !
एकनाथरावांची मनधरणी..
घेतलेल्या निर्णयावर नेहमीच ठाम राहणारे फडणवीस यांनी एकनाथरावांच्या नाराजीची तात्काळ दखल घेत रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यामागे दिल्लीचा हस्तक्षेप कारणीभूत ठरला असावा, असे दिसते.
पालकमंत्रीपदावरून धुसफूस
फडणवीस यांनी दावोसला रवाना होण्यापूर्वी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. त्यात रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे तर नाशिकमध्ये गिरीश महाजन यांची वर्णी लावली होती. रायगडचे पालकमंत्रीपद चांगलेच वादग्रस्त ठरले. आदिती तटकरे नको, अशी जाहीर भूमिका स्थानिक शिवसेना नेत्यांनी घेतली होती. तटकरे यांची नियुक्ती होताच रायगडमध्ये हिंसक प्रतिक्रिया उमटली. रास्ता रोको करण्यात आला, टायर्स पेटवून देण्यात आले. शिवसेनेचे मंत्री भरतशेठ गोगावले यांनी रायगड पालकमंत्रीपदासाठी जाहीरपणे वक्तव्य केले होते. तटकरे यांची नियुक्ती झाल्याने गोगावले यांची पार नाचक्की झाली. दुसरे म्हणजे त्यांची कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली नव्हती. नाशिकमध्ये शिवसेनेच्या दादा भुसे यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्याची शिवसेनेची मागणी होती. पण, या जिल्ह्यात फडणवीस यांचे विश्वासू गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती.
एकनाथरावांना धक्क्यावर धक्के
राज्यांमध्ये महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून फडणवीस यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाला एकापाठोपाठ एक धक्के दिले होते. शिंदे गटाच्या काही मंत्र्यांची नियुक्ती फडणवीस यांच्यामुळे झाल्याची चर्चा होती. शिंदे यांना गृहखाते देण्यासही विरोध झाला होता. एस. टी. बस खरेदीची निविदा रद्द करण्यात आली. सिडकोच्या अध्यक्षपदावरून शिंदे यांचे विश्वासू संजय शिरसाट यांची उचलबांगडी करण्यात आली. याशिवाय छोटे-मोठे अनेक निर्णय बदलण्यात आले. यामुळे शिंदे गटात अस्वस्थता होती. पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीवरून शिंदे गटाला मोठा धक्काच देण्यात आला होता.
थोडक्यात काय, या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी ही बाब फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली. याशिवाय शिंदे यांनी दिल्लीतील भाजप नेत्यांकडे नाराजी व्यक्त केली आहेच. यानंतरच फडणवीस यांनी दावोस दौऱ्यावर असताना सामान्य प्रशासन विभागाला रायगड व नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्यांना स्थगिती देण्याचा आदेश दिला. त्यानुसार रविवारी सुट्टी असतानाही रात्री दहाच्या सुमारास सामान्य प्रशासन विभागाने स्थगिती आदेश जारी केला. शिंदे यांनी दिल्लीत नाराजी व्यक्त केल्यानेच ही स्थगिती देण्यात आल्याचे शिंदे यांच्या गोटातून सांगण्यात येत आहे. शिंदे यांच्या नाराजीची भाजपला दखल घ्यावी लागली आहे.
उघडउघड दिल्लीचा हस्तक्षेप
दिल्लीच्या हस्तक्षेपामुळेच फडणवीस यांनी स्थगिती दिल्याची चर्चा आहे. मंत्र्यांची संख्या, खातेवाटप, पालकमंत्र्यांची नियुक्ती, यापाठोपाठ लगेचच स्थगिती यामुळे विक्रमी संख्याबळ मिळूनही महायुतीमध्ये आलबेल नाही, हे सरकार स्थापन झाल्यापासून वारंवार समोर येत आहे. एकनाथरावांची अवस्था या सर्व पार्श्वभूमीवर रुसू बाई रुसू . दरेगावला जाऊन बसू, अशी झाली आहे, हे वेगळे सांगायला नको !