31 ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर करणार, चंद्रकांत पाटील यांची माहिती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/chandrakant-patil.jpg)
सांगली – राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झाल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या 31 ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर करू असं राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले आहेत.
सांगलीमधील जत येथे ग्रामीण रुग्णालयाचं भूमिपूजन आणि भाजपा कार्यकर्ता मेळाव्यासाठी चंद्रकांत पाटील आले होते. यावेळी बोलताना त्यांनी दुष्काळ जाहीर करणार असल्याची माहिती दिली. राज्यातील तब्बल 172 तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यापूर्वी येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत राज्यात दुष्काळाबाबतची घोषणा केली जाईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावात एका पत्रकार परिषदेत दिली होती.
दरम्यान, राज्यातील नद्या-नाले-तळी जलयुक्त आणि राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेचा गाजावाजा करीत १६ हजार गावे दुष्काळमुक्त झाल्याचा दावा सरकारच्याच एका अहवालामुळे फोल असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या चार वर्षांत जलयुक्त शिवार योजनेवर हजारो कोटी रुपये खर्च करूनही भूजल पातळी वाढण्याऐवजी १४ हजार गावांतील भूजल पातळीत एक मीटरने घट झाल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. राज्यात गेल्या चार वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार योजनेमुळे अनेक गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली असून हजारो गावे दुष्काळमुक्त झाल्याचा दावा सरकार करीत आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेवर आतापर्यंत सात हजार ४५९ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
गेल्या तीन वर्षांत समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जलयुक्त शिवार योजना कमालीची यशस्वी झाल्याचा सरकारचा दावा यावेळच्या दुष्काळामुळे मात्र फोल ठरू लागला आहे. त्यातच जलंसपदा विभागाअंतर्गत येणाऱ्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या ताज्या अहवालात गेल्या पाच वर्षांची तुलना करता एकूण ३५३ तालुक्यांपैकी २५२ तालुक्यांतील १३ हजार ९८४ गावांमधील भूजल पातळीमध्ये एक मीटरपेक्षा जास्त घट झाल्याचे आढळले. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने सप्टेंबरच्या अखेरीस आणि ऑक्टोबरमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती प्रकाशात आली आहे. राज्यातील तीन हजार ३४२ गावांमध्ये भूजल पातळी तीन मीटरपेक्षा जास्त, तीन हजार ४३० गावांमध्ये दोन ते तीन मीटरने, तर सात हजार २१२ गावांमध्ये एक ते दोन मीटरने भूजल पातळी घटल्याचेही या अहवालत नमूद केले आहे. अपुरा पाऊस, सिंचनासाठी पाण्याचा अतिउपसा, सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक प्रवाही पद्धतीमुळे होणारा पाण्याचा अपव्यय तसेच पाण्याचे नियोजन आणि व्यवस्थापनाच्या अभावामुळे भूजल पातळी घटल्याचेही अहवालात म्हटले आहे.