‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन’ यंदा महा कुंभमेळ्याला समर्पित!
"भक्ती-संस्कृती-परंपरा" थीमद्वारे देणार पर्यावरण रक्षणाचा संदेश
![Indrayani River Cyclothon dedicated to Maha Kumbh Mela this year](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/Indrayani-River-Cyclothon-780x470.jpg)
भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांची माहिती
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद झालेली आणि इंद्रायणी नदी स्वच्छता अन् संवर्धनाबाबतचा संदेश देणारी ‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन’ यंदा महा कुंभमेळ्याला समर्पित केली असल्याचे भाजपा नेते तथा भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या पुढाकाराने आणि अविरत श्रमदान, सायकल मित्र-पुणे, महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि शिवांजली सखी मंच यांच्यासह विविध पर्यावरण प्रेमी संस्था, संघटना आणि स्वयंसेवीवृत्तीने काम करणारे मान्यवर या सर्वांच्या पुढाकारातून ‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन’चे आयोजन करण्यात येते. भोसरीतील गाव जत्रा मैदानावर येत्या रविवारी, दि. 19 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजता या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत आमदार महेश लांडगे म्हणाले की, पर्यावरण रक्षणाचा संदेश देणे आणि युवा पिढीमध्ये सायकलिंग व नियमित व्यायाम याबाबत जनजागृती करणे. या उद्देशाने 2017 पासून आम्ही प्रतिवर्षी ‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन’ आयोजित करीत आहोत. सायक्लोथॉचे यंदा 9 वे वर्ष आहे. श्रीक्षेत्र आळंदी आणि श्रीक्षेत्र देहू अशा तीर्थक्षेत्रांना जोडणारी इंद्रायणी नदीबाबत महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदयामध्ये विषेश महत्त्व आहे. नदी प्रदूषणामुळे इंद्रायणीचे अस्थित्व धोक्यात आले आहे. अशा पवित्र इंद्रायणीला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी ‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
हेही वाचा – ‘इंदिरा गांधी मोठ्या नेत्या, पण तेव्हा आमच्यासाठी व्हिलन होत्या’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान
‘रिव्हर सायक्लोथॉन’च्या आयोजनासाठी पुढाकार घेतात. पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील सुमारे 35 हजार सायकलपटू युवक-युवती आणि अबालवृद्ध सायकल रॅलीमध्ये सहभागी होतात. गतवर्षी रिव्हर सायक्लोथॉनची 2022 मध्ये ‘ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद झाली आहे. ‘सायकलची सर्वात मोठी रांग’ हे रेकॉर्ड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये नोंदवण्यात आले, ही बाब तमाम पिंपरी-चिंचवडकर आणि पर्यावरणप्रेमींसाठी निश्चितच अभिमानाची आहे. हा अभिमान जपण्यासाठी सोबतच शहराच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी चळवळ नागरिकांच्या मनातून निर्माण करणे आवश्यक आहे हाच उदात्त हेतू ठेवून प्रतिवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाते.
तसेच, ‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन’मध्ये पर्यावरण प्रेमी, सायकलपटू आणि सर्वसामान्य नागरिकांना सहज सहभागी होता यावे. या करिता https://rivercyclothon.in/ हे संकेतस्थळ निर्माण केले आहे. याद्वारे ऑनलाईन पद्धतीने नागरिकांनी सायक्लोथॉनसाठी नोंदणी करावी. सायक्लोथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे यावर्षी विक्रमी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आमदार लांडगे यांनी केले आहे.
भारतीयांचे श्रद्धास्थान प्रयागराज, उत्तरप्रदेश येथे महाकुंभ मेळा सुरु आहे. १२ वर्षांनंतर होणारा हा जगातील सर्वात मोठा अध्यात्मिक सोहळा आहे. त्यामुळे यावर्षीची ‘इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन’ कुंभमेळ्याला समर्पित केली आहे. “भक्ती-संस्कृती-परंपरा” अशी थीम आहे. नदी स्वच्छता, पर्यावरण रक्षण असा उदात्त हेतू ठेवून आयोजित केलेल्या या उपक्रमासाठी जास्तीत जास्त सहभाग द्यावा. पर्यावरण संवर्धनाची चळवळ प्रत्येकाच्या मनात जागृत व्हावी, अशी अपेक्षा आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा. भाजपा, पिंपरी-चिंचवड.