अरे, भीक नको, पण कुत्री आवरा!
सध्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रचंड वजनदार घराण्यातील राजकारणी, माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी एक विधान केले. त्याला एवढी प्रसिद्धी मिळाली, की गेले दोन दिवस सोशल मीडियावर अक्षरशः हैदोस सुरू आहे. यांना कोणाला शिर्डीच्या संस्थानशी किंवा श्री साईबाबांशी देणं घेणं नाही, या अशा मंडळींनी ही या नाजूक विषयात उडी घेऊन विषय प्रचंड ताणला आहे.
प्रत्यक्षामध्ये ,शिर्डी संस्थानतर्फे विनामूल्य भोजनालय चालवले जाते. हे भोजनालय देवस्थानने चालवलेले असल्यामुळे त्याला भोजनालय न म्हणता प्रसादालय असे म्हटले जाते. शिर्डीमध्ये येणाऱ्या हजारो भाविकांना प्रसाद म्हणून विनामूल्य भोजन देण्याची व्यवस्था याकेली जाते. विखे घराण्यातील चौथ्या पिढीतील नेते डॉ. विखे यांनी हे भोजनालय बंद करा आणि त्या ऐवजी सवलतीच्या दरात सशुल्क प्रसादालय चालू करा, अशी एक अत्यंत व्यवहार्य सूचना केली. पण, बोलण्याच्या ओघात ते बोलून गेले, की या भोजनालयामुळे भिकाऱ्यांचे तांडे शिर्डीकडे वळत आहेत.
नाजूक विषय, गदारोळ अपेक्षितच !
अर्थात् च या विधानावर गदारोळ उठणे अपेक्षितच होते. दुर्दैवाने, आपल्याकडे संवेदना आणि जाणीवा अतिशय टोकाच्या असतात आणि त्या टोकदार नसल्या तर त्यांना टोकदार करण्याचे काम अनेक ‘उपटसुंभ’ नेते आणि त्यांचे चेले चपाटे करत असतात. डॉ. विखे यांच्या विधानामध्ये काहीही गैर आहे, असे वाटत नाही. एक तर या, शिर्डी संस्थानकडे अमाप संपत्ती आहे. त्यामुळे ते मोफत प्रसादालय चालू ठेवण्याइतके आर्थिकदृष्ट्या सबळ आणि सक्षम आहेत. परंतु, याचे गंभीर सामाजिक परिणाम काय होत आहे, याच्याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते, हे सुद्धा लक्षात घ्यायला हवे.
देशामध्ये जवळपास प्रत्येक गुरुद्वारामध्ये लंगरची प्रथा गेली कित्येक वर्षे सुरू आहे. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात तर चोवीस तास लंगर चालू असते. अगदी अवेळी आलेला भाविक सुद्धा उपाशीपोटी जाऊ नये, हा तेथील रिवाज आहे आणि येणारे भाविकही प्रसाद म्हणून थोडे कां होईना, पण त्या लंगरमध्ये भोजन करून जातात. ठिकठिकाणच्या गुरुद्वारांमध्ये अशीच लंगरची व्यवस्था केलेली असते. प्रत्येक ठिकाणी अगदी चोवीस तास नसली तरी दोन तास, चार तास अशी तिथल्या आवश्यकतेप्रमाणे लंगर चालू ठेवली जातात आणि त्याचा लाभही असंख्य भाविक घेत असतात.
गुजरातमध्ये काही मंदिरांमध्ये दुपारच्या भोजनाची व्यवस्था विनामूल्य केली जाते आणि विशेष म्हणजे दर्शनाला आलेल्या भाविकांना तेथील सेवक हे अगदी हात जोडून विनवणी करून प्रसाद घेऊन जाण्याची विनंती करत असतात. आपल्याकडे शेगाव, गोंदवले, अक्कलकोट येथेही मोफत भोजनालये चालतात. हे सगळे सांगण्याचे कारण एवढेच की या सर्व ठिकाणी कोठेही स्थानिक नागरिक या सुविधेचा लाभ किंवा गैरफायदा घेताना पाहिले नाहीत, तशा तक्रारी सुद्धा नसतात. स्थानिक नागरिक हा दर्शनाला येतो आणि दर्शन घेऊन लगेच परत जातो. भोजनाची आणि प्रसादाची व्यवस्था ही मुख्यत्वे करून परगावाहून आलेल्या भाविकांसाठी केली जाते. म्हणून अशा ठिकाणी भोजनाच्या वेळेस भिक्षेकर्यांच्या रांगा मंदिराबाहेर लागत नाहीत.
अनेक ठिकाणी प्रसाद म्हणून लाडू किंवा शिरा दिला जातो. अनेक गुरुद्वारांमध्ये भाविक पहिल्यांदा प्रसादाचा शिरा खरेदी करून तेथील सेवकांजवळ देतात आणि नंतर प्रसादाच्या रांगेत उभे रहातात. तेथेही कधी असे भिकारी बघितले नाहीत. लंगर मध्ये येणारे भाविक तर प्रसादाच्या आधी तिथल्या दानपेटी मध्ये आपल्या कुवतीनुसार त्या भोजनाचे मूल्य समर्पण करतात. अगदी देवाच्या दारातूनही काही फुकट घेण्याची प्रवृत्ती तेथे दिसत नाही. आपला समाज धार्मिक आहे आणि जास्तीत जास्त देण्याकडे त्याची प्रवृत्ती असते, हे मान्य करावेच लागेल.
फुकट्यांची मनस्वी चीड
अनेक वेळा महाराष्ट्रामध्ये धार्मिक स्थळांना भेटी दिल्या असताना मात्र अनुभव मात्र अत्यंत वेदनादायी आले आहेत. रुग्णालयये आणि तीर्थक्षेत्रे येथे भिकाऱ्यांची अक्षरशः मांदियाळी म्हणजेच झुंबड दिसते. अशा ठिकाणी सर्वसाधारणपणे माणूस काहीसा भावुक आणि संवेदनशील झालेला असतो आणि नेमक्या याच मानसिकतेचा फायदा हे भिक्षेकरी घेत असतात.
शरीराने अपंग अथवा व्याधीग्रस्त असा कोणी असेल तर त्याला भोजनासाठी मदत करण्यामध्ये कोणालाच कधी वाईट वाटणार नाही. परंतु शरीराने अत्यंत धडधाकट आणि केवळ कुठलेही काम करायचे नाही, अशा ऐतखाऊ मानसिकतेमध्ये जेव्हा हे भिकारी फुकट मिळणाऱ्या गोष्टींसाठी रांगा लावतात त्यावेळी केवळ चीड येते.ही मनोवृत्ती मंदिर व्यवस्थापनाकडून अशा फुकट भोजनालयांमधून जोपासली जात असते. पंढरपूर, आळंदी, शिर्डी अशा कितीतरी ठिकाणी हा प्रकार राजरोसपणे दिसतो.
पूर्वी, एकदा सरकारने कल्याणजवळ एक भिक्षेकरी आश्रम काढला होता आणि पुण्या-मुंबईमधून रस्त्यावर भीक मागणारे भिकारी पकडून त्यांना या आश्रमात नेऊन ठेवले होते. परंतु,हे सर्वजण तेथून पळून आले. कारण तिथे थोडं फार काम करावे लागत असे.
कोणाला काहीही फुकट द्यायला नको !
कुठलीही गोष्ट कोणाला फुकट देऊ नये, हे मत दिवसेंदिवस समाजामध्ये अधिक घट्ट होत चालले आहे. फुकट दिलेल्या वस्तूची किंमत नसते, मग ती भिकाऱ्याला दिलेली भीक असो किंवा झोपडपट्टीवाल्यांना दिलेली मोफत घरे. त्याची किंमत नसणारच !
असो, ज्या कोणाला डॉ. विखे यांच्या विधानाचा विपर्यास करून धार्मिक संवेदना आणि जाणीवा टोकदार करायच्या असतील, त्यांनी त्या खुशाल कराव्यात, पण बराच मोठा समाज अत्यंत खुल्या मनाने विखे यांचे अभिनंदन आणि अनुमोदन करतो. कुठलेही तीर्थस्थान आणि मंदिराकडे जाणारे रस्ते हे गलिच्छ करण्यामध्ये सर्वात मोठा हातभार या भिकाऱ्यांनी लावलेला आहे आणि त्यांना तसं करू देण्यास आपल्यासारखे आंधळे भाविक प्रोत्साहन देत आहेत. देवस्थान व्यवस्थापनाने याबाबत अत्यंत डोळस आणि कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
मंदिर आणि मंदिर परिसरातील स्वच्छता, पावित्र्य आणि आरोग्य या दृष्टीने असे निर्णय अतिशय आवश्यक आहेत. परंतु तसे होईल अशी मानसिकता आज तरी समाजात आणि देवस्थानांमध्ये दिसत नाही, आत्ता डॉ. विखे यांच्या पाठीशी ठाम उभे राहू या, वेगवेगळ्या समाज माध्यमांच्या माध्यमातून भुंकणाऱ्या कुत्र्यांना आवरा, अशी एकमुखी मागणी करू या. श्री साईबाबांचा ‘श्रद्धा आणि सबुरी’ सहा मंत्र जपू या आपल्या हातात दुसरे आहे तरी काय ?





