पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ३१ डिसेंबरला वाहतुकीत मोठे बदल, इथं रस्ते बंद

पुणे | सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गर्दी करतात. पुण्यातील लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता गर्दीने फुलून जातो. आज सायंकाळी ५ वाजलेनंतर लष्कर आणि डेक्कन जिमखाना भागात वाहतूक बदल करण्यात आले आहेत.
वाय जंक्शनकडून महात्मा गांधी रस्त्याकडे येणारी वाहतूक १५ ऑगस्ट चौक येथे बंद करून ती कुरेशी मशीद आणि सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे. इस्कॉन मंदिराकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, तसेच अरोरा टॉवर्सकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. व्होल्गा चौकातून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
हेही वाचा – प्रत्येकाने ‘रस्ता सुरक्षा ब्रँड अँबेसिडर’ बनावे; बापू बांगर
कोथरूड आणि कर्वे रस्त्याकडून येणारी वाहतूक खंडुजीबाबा चौक येथे थांबविण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता, अलका चित्रपटगृहाकडे वळविण्यात येणार आहे. तसेच झाशीची राणी चौकातून वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक गोखले स्मारक चौक, उपरस्ते, पुणे महापालिका भवन, ओंकारेश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज रस्तामार्गे वळविण्यात येणार आहे.





