चिमुरड्या मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राजगुरुनगरमध्ये कडकडीत बंद !
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा
![Children, girls, atrocities, protests, Rajgurunagar, karkardi, bandh, humanity, kalima, protest, march,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/nisheda-780x470.jpg)
राजगुरुनगर : नराधमाला फाशी झालीच पाहिजे….. फाशी द्या फाशी द्या….
चिमुरड्यांना न्याय मिळालाच पाहिजे, अशा संतप्त घोषणेने राजगुरुनगर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ राजगुरुनगर वासियांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेऊन पीडित कुटुंबाच्या न्यायासाठी निषेध मोर्चा काढला. या मोर्चात राजगुरूनगर सह पंक्रोशीतील नागरिक उस्फुर्तपणे सहभागी झाले होते.
राजगुरुनगर येथे वास्तव्यास असलेल्या गरीब कुटुंबातील दोन अल्पवयीन मुली घराबाहेर खेळत असताना बेपत्ता झाल्या असल्याची तक्रार २५ डिसेंबर रोजी देण्यात आली होती. २६ डिसेंबर रोजी या मुलींचे मृतदेह एका पाण्याच्या बॅरल मध्ये आढळून आले.पोलिसांनी अधिक तपास केला असता जवळच असलेल्या एका बियर बार मध्ये काम करणाऱ्या अजय दास नामक परप्रांतीय नराधम कडून या अल्पवयीन मुलींचा खून व अत्याचार केल्याची घटना उघडीस आली होती.
या घटनेचे पडसाद संपूर्ण शहर परिसरात उमटले होते.
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या कृत्याने राजगुरुनगर शहरात संतापाची भावना व्यक्त होत होती.मृत मुलींच्या नातेवाईकांनी आक्रोश करीत आरोपीस तात्काळ फाशी द्या,आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करीत खेड पोलीस स्टेशन समोर गोसावी समाजाने ठिय्या आंदोलन सुरू केले होते. या गरीब कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्यासाठी राजगुरुनगर मधील सर्व समाजसेवी संस्था,संघटना राजकीय पुढारी एकटवले ,
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन शासनाकडून आर्थिक मदत देऊन न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
आम्ही राजगुरुनगर च्या वतीने पीडित कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी घटनेच्या निषेधार्थ राजगुरुनगर बंद च्या आवाहनाला राजगुरुनगर वासियांनी उत्फुर्त प्रतिसाद देत शनिवारी सकाळ पासून आपले व्यवहार बंद ठेवून निषेध मोर्चात सहभागी झाले होते.
चिमुरड्यांना न्याय मिळालाच पाहिजे,नराधमाला फाशी झालीच पाहिजे,फाशी द्या फाशी द्या अशा घोषणेने हुतात्मा राजगुरू ,भगतसिंग सुखदेव यांच्या स्मृती स्थळापासून निघालेला निषेध मोर्चा शहरातून तहसीलदार कार्यालय जवळ येऊन निषेध सभा घेऊन संपन्न झाला.या निषेध मोर्चात सर्व समाजातील राजकीय,सामाजिक,शैक्षणिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी समाजसेविका सुधा कोठारी, विजया शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अतुल देशमुख, शिवसेना शिंदे गटाचे भगवान पोखरकर,काँग्रेसचे विजय डोळस, समाज सेवक कैलास दुधाळे,आदींनी संतप्त भावना व्यक्त करून या घटनेचा निषेध केला.यावेळी हुतात्मा राजगुरू फाऊंडेशन अध्यक्ष बाळासाहेब सांडभोर,सचिव अमर टाटीया , राजमाला बूट्टे पाटील,अंकुश राक्षे,नाझनिन शेख,वामन बाजारे,दिलीप होले,रेखा क्षोत्रीय,उर्मिला सांडभोर, व शहरातील अनेक जण यादरम्यान उपस्थित होते.
सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी करण्यात आली आहे.
पीडितांच्या न्यायासाठी दोन दिवस आम्ही उपोषण केले मात्र यामुळे प्रश्न सुटणार नाही. अनेक पालक दहशतीच्या छायेखाली आहेत. न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे.
संजय कदम
अध्यक्ष, भटके विमुक्त समाज
मुख्यमंत्री निधीतून सहायत्ता निधी साठी प्रस्ताव पाठविलेला आहे. समाज कल्याण च्या माध्यमातून मनोधर्या योजनेतून संबंधितांना मदत करणार असल्याचे यावेळी सांगितले.
ज्योती देवरे, तहसीलदार