‘अत्याचारांची प्रकरणे जलदगती न्यायालयापुढे चालवावीत’; डॉ. नीलम गोर्हे यांच्या सूचना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/BJP-government-2024-12-28T164454.708-780x470.jpg)
पुणे : पुण्यातील विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी राहणार्या पाच वर्षांच्या चिमुकलीसोबत पोलिसानेच अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. तसेच, राजगुरुनगरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून दोन्ही सख्ख्या बहिणींना पाण्याच्या बॅरलमध्ये टाकून त्यांचा खून केल्याच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेच्या उपसभापती तसेच शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोर्हे यांनी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देखमुख यांच्यासोबत चर्चा करून घटनांची माहिती घेतली.
राजगुरुनगरमधील घटनेसंबंधी डॉ. गोर्हे यांनी राजगुरुनगर व लगतच्या परिसरात परप्रांतियांचा लोढा वाढत असल्याकडे लक्ष केंद्रित केले. सामान्य मजुरांसोबत समाजकंटक व बेकायदेशीर धंद्यातील घटकही येत आहेत. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊन सामाजिक शांततेस बाधा निर्माण होत आहे, अशा आरोपींना कडक शिक्षा करण्यात यावी.
हेही वाचा – हॉटेल्स सकाळी ५ पर्यंत खुले राहणार पण मिळणार ‘इतकेच’ पेग, जाणून घ्या थर्टी फस्टसाठीची नियमावली
पुणे जिल्ह्यातील परप्रांतियांची नोंदणी करण्यात यावी. त्यांच्यावर प्राधान्याने लक्ष ठेवण्यात यावे. घटनेच्या अनुषंगाने सर्व परिस्थितीजन्य पुरावे, न्यायवैद्यकीय दस्तऐवज एकत्रित करून न्यायालयापुढे सादर करण्यात यावे.हे प्रकरण जलदगती न्यायालयापुढे चालवावे. विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती प्राधान्याने करण्यात यावी. तसेच, याबाबतच्या कार्यवाहीचा अहवाल पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत.
कोंढवा परिसरात स्कूल बसचालकाने विद्यार्थिनीचा (दि. 11 डिसेंबर) विनयभंग केल्याप्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी पुणे पोलिसांना निर्देश दिले आहेत. शहरात महिला व लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये, गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये वाढ झाली आहे. या प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, आरोपीला जामीन होणार नाही याची दक्षता घ्यावी, प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे, विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी, अशा सूचना केल्या आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांना ने- आण करणार्या वाहतूक बसबाबत शासनाने मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे सुचित करण्यात आले. तसेच, केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पाठवावा, असे डॉ. गोर्हे यांनी पोलिस आयुक्तांना सुचित केले आहे.