महाराष्ट्र पुरोगामी हे थोतांड, राज्य प्रचंड जातीवादी; भाजपा आमदाराचं विधान चर्चेत
![Gopichand Padalkar said that Maharashtra progressives are a bigot, the state is extremely casteist.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/BJP-1-780x470.jpg)
मुंबई | महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे, हे थोतांड आहे. फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा महाराष्ट्र आहे, हे फक्त भाषणापुरते मर्यादित राहिलंय, असे भारतीय जनता पक्षाचे जतमधील नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. तर राज्य प्रचंड जातीवादी आहे, हे बदलावे लागेल. यासाठी काम करावे लागणार असल्याचं पडळकर यांनी म्हटलं आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले, की मी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून आपल्या भागासाठी सर्व विभागांचे जास्तीत जास्त पैसे आणेन. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. इतर समाजाचे विषय असतील, तर मला सांगा. लोक म्हणतात महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. पण हे सगळं थोतांड आहे. महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांवर चालतो हे फक्त भाषणात सांगण्यापुरतं आहे. हे राज्य प्रचंड जातीयवादी आहे हे डोक्यात फिट करून ठेवा. हे आपण बदलू शकत नाही.
हेही वाचा – लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती
आपल्याला काम करायचं आहे. जातीजातीतल्या भिंती तोडून सगळ्या लोकांसाठी आपल्याला एकत्र काम करावं लागणार आहे. गावागावांत आपल्याला एकत्र यावं लागणार आहे. वैचारिक पातळीवर आपल्याला एकत्र यावं लागेल. अपने तो अपने होते है, पराए अपने नहीं होते हे ध्यानात ठेवा. माझी सारखी परीक्षा का बघताय? माझी हात जोडून विनंती आहे. माझा फोनच उचलला नाही, बघितलंच नाही वगैरे सांगतात लोक. अरे कुणाकुणाचे फोन उचलू? बहिला झालो मी आता. किती फोन येतात, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
महाविकास आघाडीची सत्ता गेली आहे. आता मी त्यावर जास्त बोलू नये. कुणाच्यात हिंमत आहे का सरकारच्या विरोधात लढायची? सांगलीत जयंत पाटील आहेत. त्यांच्यात हिंमत आहे का सरकारच्या विरोधात लढायची? २०१९ चं भाषण ऐका. देवाभाऊ म्हणाले होते मी पुन्हा येईन. त्यावर जयंत पाटलांनी कसं भाषण केलं होतं. आणि आता तु्म्ही नागपूरचं भाषण ऐकलं का? लढणं रक्तात असावं लागतं. लोक लगेच वळचणीला पळतात. लढू शकत नाहीत. त्यांच्यात हिंमत नाही, अशा शब्दांत पडळकरांनी जयंत पाटलांवर टीका केली.