जागेअभावी १३ घनकचरा स्थानांतरण केंद्र कागदावरच

पिंपरी : शहरात दररोज निर्माण होणारा कचरा घंटागाडीद्वारे संकलीत करुन कॉम्पॅक्टर मशीनद्वारे मोशी कचरा डेपो येथे वाहून नेला जातो. त्यासाठी केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोकडून आलेल्या निधीमधून महापालिकेच्या पर्यावरण विभागाने शहरात १६ ठिकाणी स्थानांतरण केंद्र उभारण्याचा संकल्प केलेला आहे. यापैकी केवळ तीनच स्थानांतरण केंद्र तयार करण्यात असून त्यातील केवळ दोनच सध्या कार्यरत आहेत. आवश्यक भूसंपादन नसल्यामुळे घनकचरा स्थानांतरण केंद्र कागदावरच राहिले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात दररोज सुमारे १२०० टनापेक्षा अधिक कचरा निर्माण होतो. हा कचरा कॉम्पॅक्टर वाहनाद्वारे वाहून मोशीतील कचरा डेपो येथे डंप केला जातो. या कच-यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करुन मोशी कचरा डेपोत वाहून नेण्यासाठी शहरात १६ ठिकाणी शास्त्रोक्त पध्दतीने कचरा स्थानांतरण केंद्र सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोकडून आलेला निधी खर्च केला जाणार आहे. सध्या केवळ तीनच ठिकाणी स्थानांतरण केंद्र सुरु केली आहेत. कासारवाडी, भोसरी गवळीमाथा आणि काळेवाडी येथे ही केंद्रे तयार केली आहेत. काळेवाडी स्थानांतरण केंद्र मागील पाच महिन्यापासून बंद ठेवण्यात आले आहे. कॅप्सुल मशिनचा महत्वाचा पार्ट चोरीला गेल्यामुळे हे केंद्र बंद असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा – डायमंड पार्क्सच्या ख्रिसमस चॅरिटी ड्राईव्हद्वारे प्रेमाचा प्रकाश पसरविण्याचा उपक्रम
शहराची वाढती लोकसंख्या आणि कचऱ्याचे प्रमाण पाहता प्रत्येक प्रभागात दोन कचरा स्थानांतरण केंद्र उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र, महापालिका सुरूवातीला १६ ठिकाणी केंद्र उभारणार आहे. त्यातील बहुतांश केंद्र लोकवस्तीच्या भागाला लागून असल्यामुळे नागरिकांची याबाबत नाराजी आहे. तरी, केंद्र उभारण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेचा ताबा मिळवण्यात पालिकेला यश येताना दिसत नाही. जागाच ताब्यात नसल्यामुळे स्थानांतरण केंद्र उभारण्याचा निर्णय केवळ कागदावरच रखडला आहे. परिणामी, शहरातील घनकच-याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.
घनकचरा स्थानांतरण केंद्र पूर्णतः बंदिस्त असून कचऱ्याचा परिसरातील नागरिकांना कोणताही त्रास होत नाही. एक केंद्र उभारण्यासाठी सुमारे २ कोटींचा खर्च अपेक्षित असतो. महापालिकेला केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगाकडून आत्तापर्यंत ४६ कोटी मिळाले आहेत. यापुढील काळातही आणखी निधी मिळणार असल्याची माहिती सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितली आहे.
कासारवाडी, गवळीमाथा आणि काळेवाडी या तीन ठिकाणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. पिंपरी, चोविसावाडी आणि किवळे याठिकाणी स्थानांतरण केंद्राचे काम सुरु आहे. पुढील काळात सांगवी, चिंचवड, आकुर्डी आणि बोऱ्हाडेवाडीतील कचरा स्थानांतर केंद्राच्या कामाला सुरूवात होईल. त्यानंतर इतर भागात काम सुरु करण्याचा विचार केला जाणार आहे. परंतु, त्यासाठी अपेक्षित जागा ताब्यात आली नसल्यामुळे पालिकेकडून केंद्र उभारणीच्या कामाला अध्याप सुरुवात करण्यात आलेली नाही.
सध्या किवळे, चोविसावाडी, पिंपरी येथे स्थानांतरण केंद्र उभारण्यात येत आहे. जसजशी जागा ताब्यात येईल, तसे पुढील स्थानांतरण केंद्र उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल. अत्याधुनिक व शास्त्रोक्त पध्दतीने उभारण्यात येणा-या स्थानांतरण केंद्राच्या परिसरात वास अथवा दुर्गंधी येणार नाही.
– संजय कुलकर्णी,मुख्य अभियंता, पर्यावरण विभाग





