ऊस दराच्या तोडग्यासाठी तातडीने बैठक घ्या; शेतकरी संघटनांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
ऊसाला पहिली उचल ४ हजार व दुसरा हप्ता ५०० रुपये जाहीर करावा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
सांगली । ऊसाला पहिली उचल ४ हजार रुपये मिळावी व दुसरा हप्ता ५०० रुपये मिळावा अशी बळीराजा शेतकरी संघटनेने मागणी आहे. कारखानदारांनी पहिली उचल ४ हजार रुपये व दुसरा हप्ता ५०० रुपये जाहीर करावा अशी मागणी आहे. ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी कारखानदार व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर घ्यावी अशी मागणी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना भेटून केली.
याबाबत शेजारी संघटनांच्या वतीने बळीराजा शेतकरीसंघटनेचे राज्य युवा अध्यक्ष गणेश शेवाळे, बळीराजा संघटनेचे निवास गायकवाड-पाटील, शहाजी पाटील मनोज घोरपडे, रयत क्रांती संघटनेचे जितेंद्र सूर्यवंशी, सलीम सय्यद, अनिल चव्हाण, दत्तात्रय देसाई, महिला आघाडीच्या प्रमुख सरिता माने, विजया पवार तसेच कार्यकर्ते व महिला आदींनी आज जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची भेट घेतली. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधीकार्यांना दिले.
ऊस दर जाहीर करूनच साखर कारखाने सुरु करावेत असे आदेश असतानाही जिल्ह्यातील कारखानदारांनी ऊसदर जाहीर न करताच साखर कारखाने सुरु केले आहेत. सोलापूर जिल्ह्यात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने एकरकमी पहिली उचल जाहीर केली आहे. पण, जिल्ह्यातील साखर कारखानदार ऊस दराबाबत गप्प आहेत. कारखानदारांनी ऊसाला पहिली उचल ४ हजार रुपये व दुसरा हप्ता ५०० रुपये जाहीर करावा बळीराजा शेतकरी संघटनेची मागणी आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे युवाध्यक्ष गणेश शेवाळे यांनी दिला आहे.





