नागार्जुनांचा दुसरा मुलगा अखिल अक्किनेनी याने साखरपुडा उरकला
नाग चैतन्यच्या दुसऱ्या लग्नाआधी सावत्र भावाचा साखरपुडा
![Nagarjuna, Son, Akhil Akkineni, Sakharpuda, Naga Chaitanya, Marriage, Stepfather, Bhav,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/akhil-akkneni-780x470.jpg)
हैदराबाद : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन यांचा मुलगा नाग चैतन्य दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकण्यास सज्ज झाला आहे. डिसेंबर महिन्यात नाग चैतन्य आणि अभिनेत्री सोभिता धुलिपाला यांचं लग्न होणार आहे. मात्र त्यापूर्वी नागार्जुन यांचा दुसरा मुलगा अखिल अक्किनेनी याने साखरपुडा उरकला आहे. खुद्द नागार्जुन यांनी त्यांच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर फोटो पोस्ट करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली आहे. अखिल हा नागार्जुन आणि त्यांची दुसरी पत्नी आमला यांचा मुलगा आहे. त्यामुळे नाग चैतन्य हा त्याचा सावत्र भाऊ आहे. अखिलने याआधी 2016 मध्ये श्रिया भुपालशी साखरपुडा केला होता. श्रिया ही मोठे व्यावसायिक जी. व्ही. कृष्णा रेड्डी यांची नात आहे. 2017 मध्ये दोघं लग्न करणार होते. मात्र लग्नापूर्वीच त्यांचा साखरपुडा मोडला. यामागील कारण कधी समोर आलं नाही.
माझ्या मुलाच्या साखरपुड्याची बातमी सांगताना मला खूप आनंद होत आहे. झायनाब रावदजी ही आमची सून आहे. मी झायनाबचं आमच्या कुटुंबात स्वागत करतो. या दोघांना शुभेच्छा आणि आशीर्वाद द्या. त्यांचं आयुष्य प्रेम, आनंद आणि असंख्य आशीर्वादाने भरलेलं असो, अशी पोस्ट नागार्जुन यांनी लिहिली आहे. अखिलनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर झायनाबसोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. माझ्या आयुष्याची साथीदार मला भेटली. झायनाब आणि माझ्या साखरपुड्याची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे, अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.
अखिलचा जन्म कॅलिफोर्नियामध्ये झाला. त्यानंतर तो शिक्षणासाठी काही वर्षे ऑस्ट्रेलियामध्ये राहिला. पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी तो हैदराबादमध्ये परतला. वयाच्या 16 व्या वर्षी त्याने अभिनयाचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. अखिलने बालकलाकार म्हणूनही चित्रपटांमध्ये काम केलंय. 1995 मध्ये तो ‘सिसिंद्री’ या चित्रपटात पहिल्यांदा झळकला होता. त्यानंतर 2014 मध्ये त्याने ‘मनम’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अक्किनेनी कुटुंबातील तिनही पिढ्यांनी भूमिका साकारल्या होत्या. 2015 मध्ये त्याने ‘अखिल’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.