‘१५०० घेवून काँग्रेसच्या रॅलीत जाणाऱ्या महिलांचे फोटो काढा, त्यांची व्यवस्था करतो’; भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान

Dhananjay Mahadik | राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरु आहे. या निवडणुकीत महायुती सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेची राज्यात मोठी चर्चा आहे. मात्र, ऐन निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडीक यांनी केलेल्या एका विधानामुळे वाद रंगण्याची चिन्ह आहेत. लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये पैसे घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅलीत दिसल्या तर महिलांचे फोटो काढून पाठवा, आम्ही त्यांची व्यवस्था करतो, असं महाडिक यांनी कोल्हापुरातील एका सभेत म्हटलं आहे. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
धनंजय महाडीक नेमकं काय म्हणाले?
जर या ठिकाणी काँग्रेस पक्षाची रॅली निघाली आणि त्यामध्ये जर तुम्हाला महिला दिसल्या, ज्या महिला १५०० रुपये आपल्या योजनेचे घेतात, त्यांचे फोटो काढून घ्या आणि नावं लिहून घ्या. म्हणजे घ्यायचं आपल्या शासनाचं आणि गायचं त्यांचं असं चालणार नाही. अनेक ताया महाराष्ट्रात छाती बडवत आहेत. आम्हाला पैसे नकोत, आम्हाला सुरक्षा पाहिजे असं म्हणतात. मग पैसे नकोत का? या पैशांचं राजकारण करता? आता काँग्रेसच्या सभेला जर महिला दिसल्या तर जाऊन फोटो काढायचे. काँग्रेसच्या रॅलीमध्ये महिला दिसल्या तर जाऊन फोटो काढायचे आणि आमच्याकडे द्यायचे, आम्ही त्यांची व्यवस्था करतो. जर कोणी मोठ्याने भाषण करायला लागली तर एक फॉर्म द्यायचा आणि या फॉर्मवर सही कर म्हणायचं. नको आहेत ना पैसे. लगेच उद्यापासून बंद करतो म्हणायचं. लगेच बंद, आमच्याकडेही पैसे जास्त झाले नाहीत, असं धनंजय महाडीक यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – ..मग मी पण बघतो तुम्ही आमदार कसे राहता; अजितदादांचा रामराजेंना इशारा
दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने टीका केली आहे. दुश्मनाच्या सुनेलाही ज्यांनी बहिणीचा मान दिला. साडीचोळी देऊन सन्मान केला त्याच शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात…माता भगिनींचा बंदोबस्त करतो, म्हणणाऱ्या भाजपा खासदाराने फक्त राज्यातील माता-भगिनींचाच नव्हे तर माता जिजाऊ, माता सावित्री, माता अहिल्यादेवी या आपल्या आदर्शांचाही अपमान केला आहे. महाराष्ट्र हे विसरणार नाही, असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने ट्वीट करत म्हटलं आहे.





