‘विधानसभा निवणुकीनंतर काहीही होऊ शकते’; नवाब मलिकांचा दावा
![Nawab Malik said that anything can happen after the assembly elections](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/Nawab-Malik-780x470.jpg)
Nawab Malik | २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणत अनेक मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. कट्टर विरोधी पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. त्यानंतर दोन पक्षांत फुट पडली. यानंतर आता २०२४ च्या निवडणुकीनंतर कोणता पक्ष सत्तेत बसणार याकडे संपुर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. यातच, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मोठा दावा केला आहे.
नवाब मलिक म्हणाले, की निवडणुकीनंतर भाजपाचेच सरकार येईल किंवा अजित पवार भाजपाबरोबर असतील, हे आताच सांगणे कठीण आहे. या निकालनंतर कोण कोणाच्या बरोबर असेल हे सांगताच येत नाही. आता काही लोक सांगत आहेत की, एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांचे काही तरी चालले आहे. अशी वेगवेगळी चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. पाच वर्षांपूर्वी कोण कुठे होता? लोकांना कसे पकडून आणले? हे सर्व माझ्या डोळ्यासमोर घडलेले आहे.
हेही वाचा – मोठी बातमी! मनोज जरांगेंची विधानसभा निवडणुकीतून माघार
महाविकास आघाडीमध्ये असतो तर मला अणुशक्ती नगरमधून तिकीट मिळाले नसते. मला अटक झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने माझा राजीनामा घेतला नाही, हे जरी खरे असले तरी त्यानंतर अजित पवार यांनी वैयक्तिक पातळीवर मला मदत केली. त्यामुळे मी आज त्यांच्या पाठीशी उभा आहे. जर मी मविआमध्ये थांबलो असतो तर मला तिकीटही मिळू शकले नसते. मी राजकारणात नवखा नाही, त्यामुळे काय होऊ शकते, याची मला कल्पना आहे. मला तिकीट दिल्यानंतर टीका होईल, याची पूर्ण कल्पना असूनही त्यांनी मला उमेदवारी दिली. हे फक्त अजित पवारच करू शकतात, असं नवाब मलिक म्हणाले.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटले ही चुकीची बाब आहे. पण यावर आपल्याला आता काही बोलायचे नाही. अजित पवार यांनी वैयक्तिकरित्या मदत केली, त्यामुळे आपण त्यांच्याबरोबर आलो, एवढेच एक कारण आहे. अजित पवार आज भाजपाबरोबर असले तरी त्यांनी त्यांची विचारधारा सोडलेली नाही. तसेच मीदेखील माझी समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी विचारधारा सोडलेली नाही, असंही नवाब मलिक म्हणाले.