उमेदवारीवरुन पक्षासी गद्दारी केल्यास माझ्या घराचे दरवाजे कायमचे बंद
पुणे – उमेदवारीवरुन पक्षासी कोणीही गद्दारी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना माझ्या घराचे दरवाजे कायमचे बंद राहतील, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
कुंजीरवाडी ( ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मंजूर केलेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन अजित पवार यांचे हस्ते (शनिवारी दि.13 ) करण्यात आले. याप्रसंगी ते जाहीर सभेत बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोक पवार होते. दरम्यान कुंजीरवाडीच्या सरपंच अनुराधा कुंजीर व माजी सरपंच संतोष कुंजीर यांनी मागिल तीन वर्षाच्या काळात ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांच्यासाठी दोन कोटीहून अधिक विकास कामे करण्यात आली.
पवार म्हणाले, शिरूर- हवेली आमदाराच्या कार्यपद्धतीमुळे आगामी काळात येथील आमदार राष्ट्रवादीचाच होणार आहे. याविषयी कोणाच्याही मनात शंका नाही. मात्र पक्षाच्या उमेदवारीसाठी अशोक पवार व प्रदीप कंद दोघेही तेवढेच इच्छुक आहेत. उमेदवारी कोणाला द्यायची या निर्णय खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार घेणार आहेत. या दोघांनाही संधी मिळावी यासाठी एकाने लोकसभा तर एकाने विधानसभा लढवावी, असा प्रस्ताव दिला होता. मात्र दोघेही आमदारकी लढविण्यावर ठाम असल्याने, पक्षालाच याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. सत्ता स्थापनेसाठी एक-एक जागा महत्वाची असल्याने, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षासी गद्दारी कोणत्याही परीस्थीतीत माफ न करण्याचा निर्णय घेतलेला आहे.