अजित पवारांची मोठी खेळी! संजयकाका पाटील, निशिकांत पाटील आणि झिशान सिद्दीकींचा अजित पवार गटात प्रवेश
![Sanjaykaka Patil, Nishikant Patil and Zeeshan Siddiqui join Ajit Pawar group](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Ajit-Pawar-14-780x470.jpg)
मुंबई | विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून आता उमेदवारांची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे आता लढतीही ठरल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यामुळे या निवडणुकीत काही मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच लढत दिसत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी खेळी केली आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते निशिकांत पाटील आणि सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी यांनी देखील अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
हेही वाचा – पुण्यात चंद्रकांत पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीत ‘‘विजयी शंखनाद’’
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये सात उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये वांद्रे पूर्वमधून झिशान सिद्दिकी, इस्लामपूरमधून निशिकांत पाटील,तासगावमधून संजयकाका पाटील, लोहा कंधारमधून प्रताप चिखलीकर, वडगाव शेरीमधून सुनील टिंगरे, शिरुर हवेलीमधून ज्ञानेश्वर कटके, अनुशक्तीनगरमधून सना मलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.