‘राज ठाकरेंमध्ये आम्हाला बाळासाहेब दिसतात’; रामदास कदमांकडून कौतुक
![Ramdas Kadam said that we see Balasaheb in Raj Thackeray](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Ramdas-Kadam-and-Raj-Thackeray-780x470.jpg)
मुंबई | महायुती सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. मुंबईतील प्रवेशद्वार असलेल्या पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक टिप्पणी केली आहे. हा टोलमाफीचा निर्णय म्हणजे राज्य सरकारला उशिरा सुचलेलं शहानपण आहे, असं ते म्हणाले. यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेचे रामदास कदम यांनी भाष्य केलं आहे.
रामदास कमद म्हणाले, एखादी मागणी करणे आणि ती लावून धरणे यात खूप मोठा फरक आहे. राज ठाकरे हे नेहमी स्पष्ट बोलतात. आम्ही त्यांच्यात बाळासाहेब ठाकरे यांना पाहतो. मी त्यांना सल्ला देणार नाही, मी तसा प्रयत्न केला तर ते चुकीचं ठरेल. माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे की त्यांनी चांगल्या कामाला चांगलं म्हणायला शिकलं पाहिजे.
हेही वाचा – बाबा सिद्दीकींनंतर मुनव्वर फारुकी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रडारवर, सुरक्षेत वाढ
निवडणुका आल्यावर प्रत्येक गोष्टीवर टीका केलीच पाहिजे असं नाही. राज ठाकरे स्पष्टवक्ते आहेत. देशात त्यांची तशीच प्रतिमा आहे. ती प्रतिमा त्यांनी तशीच राहू द्यावी, अशी माझी त्यांना विनंती आहे. हा निर्णय उशिरा घेतला गेला नाही. उलट त्यांनी या निर्णयाचं कौतुक करायला हवं, असं रामदास कदम म्हणाले.
दरम्यान, आज (१५ ऑक्टोबर) निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करेल. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती मनसेला आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. मात्र, मनसेने अद्याप कोणत्याही युती-आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला नाही.