बाबा सिद्दीकींनंतर मुनव्वर फारुकी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रडारवर, सुरक्षेत वाढ
Munawar Faruqui | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धीकी यांची शनिवारी (१२ ऑक्टोबर) रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. या घटनेनंतर अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. दुसरीकडे आता बिग बॉस १७ चा विजेता व स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीची सुरक्षादेखील वाढवण्यात आली आहे.
लॉरेन्स बिश्नोई गँगच्या काही लोकांनी गेल्या महिन्यात मुनव्वरला दिल्लीत ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. मुनव्वर फारुकीला सुरक्षा पुरवण्यात आली आहे, अशी माहिती या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मात्र सुरक्षेचे कारण देत त्याने जास्त तपशील देण्यास नकार दिला. लॉरेन्स बिश्नोईच्या गँगमधील काही लोकांनी मुनव्वरचा पाठलाग केला होता. सप्टेंबर महिन्यात दिल्लीतील ज्या हॉटेलमध्ये मुनव्वर थांबला होता तिथेच त्यांनी खोली बूक केली होती. मात्र गुप्तचर यंत्रणांनी वेळीच यासंदर्भात माहिती दिल्याने मुनव्वरला सुरक्षितपणे दुसरीकडे नेण्यात आलं होतं.
हेही वाचा – ‘वय ८४ होऊ द्या, ९० होऊ द्या हे म्हातारं थांबत नाही’; शरद पवारांचं वक्तव्य
हिंदू देवांवर मुनव्वरने केलेल्या टिप्पण्यांमुळे ही गँग त्याच्यावर संतापली आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये दिल्लीतील एका कार्यक्रमात शूटर्सना त्याला मारण्यास सांगण्यात आलं होतं. त्या शूटर्सनी मुंबईहून त्याच फ्लाइटने त्याच्याबरोबर दिल्लीपर्यंत प्रवास केला होता. तसेच मुनव्वर दिल्लीत ज्या हॉटेलमध्ये थांबला होता, तिथेच त्यांनी खोली बूक केली होती. यासंदर्भात इनपुट्स मिळताच गुप्तचर यंत्रणांनी दिल्ली पोलिसांना सतर्क केलं आणि त्यांनी शूटर्सचा कट उधळून लावला, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.