विधानसभेचं बिगुल वाजणार, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Maharashtra-Assembly-Election-2024-780x470.jpg)
Maharashtra Assembly Election 2024 | भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होणार आहे. या महत्त्वपूर्ण घोषणेसाठी निवडणूक आयोगाने आज दुपारी ३.३० वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या पत्रकानुसार, या पत्रकार परिषदेत संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. यामुळे आजच विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र विधानसभेची सध्याची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यापूर्वी राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या पत्रकार परिषदेत निवडणुकीची औपचारिक घोषणा अपेक्षित आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंड या दोन्ही राज्यांमध्ये तात्काळ आचारसंहिता लागू होणार आहे.
हेही वाचा – भारतातील पहिल्या संविधान भवनाची पायाभरणी
निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी २८ सप्टेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या तारखांबाबत माहिती दिली होती. महाराष्ट्र विधानसभेत एकूण २८८ मतदारसंघ आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपते आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक त्याआधीच होईल. महाराष्ट्रात ९.५९ कोटी मतदार आहेत. त्यात पुरुष ४.५९ कोटी मतदार आहेत. तर महिला ४.६४ कोटी आहेत. आम्ही तृतीय पंथीय, वृद्ध मतदार, दिव्यांग यांची विशेष व्यवस्था करणार आहोत. वृद्ध मतदारांना मतदान करण्यासाठी आम्ही मत देण्याची विनंती करतो. त्यांना केंद्रात जाणं शक्य नसेल तर घरुन मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन दिली जाईल. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची संख्याही महाराष्ट्रात चांगली आहे. १९.४८ लाख मतदार हे नवमतदार आहेत. हे तेच मतदार आहेत जे लोकशाहीला पुढे घेऊन जातील असं राजीव कुमार म्हणाले.