शरद पवार पक्षप्रवेशापूर्वी हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया
जनतेच्या आग्रहाखातर आणि इंदापूरच्या सर्वांगीण विकासासाठी मी पवारांना साथ द्यायचा निर्णय घेतला
इंदापुर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच आता अनेक बड्या नेत्यांचे इनकमिंग-आऊटगोईंग सुरु आहे. इंदापुरातील माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार आहेत. इंदापूरमध्ये आज शरद पवार गटाची सभा आयोजित करण्यात आली आहे. याच सभेत भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकिता पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. आता हर्षवर्धन पाटील यांनी पक्षप्रवेशापूर्वी प्रतिक्रिया दिली आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्यापूर्वी संवाद साधला. यावेळी त्यांनी “माझ्यासमोर उद्या येणाऱ्या निवडणुकांचे टार्गेट आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती मी निश्चित पार पाडेन”, असे वक्तव्य केले.
विकासासाठी मी पवारांना साथ द्यायचा निर्णय घेतला
माझ्यासोबत अनेक पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. आज हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करतील. मी याबद्दल देवेंद्र फडणवीसांशीही चर्चा केली आहे. मी इथून लढलं पाहिजे, असा जनतेचा आग्रह आहे. या मतदारसघांत आमच्या विचाराचे अनेक लोकप्रतिनिधी आहेत. गेल्या निवडणुकीत मी अगदी १००० ते १५०० मतांनी पडलो. जर ही मतं पडली असती, तर निकाल वेगळा लागला असता. पण आता हे होऊन गेले आहे. त्यामुळे लोकांनी मला हा निर्णय घ्या असा आग्रह केला आहे. जनता श्रेष्ठ आहे. त्यामुळे जनतेच्या आग्रहाखातर आणि इंदापूरच्या सर्वांगीण विकासासाठी मी पवारांना साथ द्यायचा निर्णय घेतला आहे, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.
मला कोणत्याही प्रतिक्रियेवर उत्तर द्यायचं नाही
मी घेतलेला निर्णय हा माझ्या तालुक्यापुरता मर्यादित आहे. मी काही मोठा राष्ट्रीय नेता नाही. त्यामुळे तालुक्यातील लोक म्हणतात, त्यानुसार मी निर्णय घेतलेला आहे. लोकशाहीत जनतेला महत्त्व आहे. यावेळी त्यांना तुम्हाला भाजपने थांबवण्याचा प्रयत्न केला नाही का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मला कोणत्याही विषयावर भाष्य करायचे नाही. माझ्यासमोर उद्या येणाऱ्या निवडणुकांचे टार्गेट आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती मी निश्चित पार पाडेन. इंदापुरातून महाविकासाआघाडीतून लढायचं की नाही हा निर्णय पक्षातील ज्येष्ठ नेते घेतील. सध्या मला कोणत्याही प्रतिक्रियेवर उत्तरं द्यायच नाही, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.