मुंबई विद्यापीठावर भगवा फडकला, युवासेनेचा सर्व १० जागांवर विजय

मुंबई | मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा शुक्रवारी (२७ सप्टेंबर) निकाल लागला. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेचा १० पैकी १० जांगावर विजय झाला आहे. त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला मोठा धक्का बसला आहे. गेल्या निवडणुकीतही युवासेनेचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. या निवडणुकीतही युवासेनेने सिनेटवरील आपलं वर्चस्व कायम ठेवल्याचं स्पष्ट झालं आहे.
युवासेनेने सिनेट निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रिया देत सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत. ‘१० पैकी १० पुन्हा एकदा! ज्यांनी आम्हाला मतदान केले, त्या सर्वांचे आणि शिवसेना (ठाकरे गट) युवासेना सहकाऱ्यांचे, तुमच्या विश्वासासाठी, पाठिंब्याबद्दल, प्रयत्नांसाठी आणि आशीर्वादाबद्दल मनःपूर्वक आभार. मुंबई विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणुकीत आम्ही आमची कामगिरी केवळ पुनरावृत्ती केली नाही तर सुधारली आहे. १०० टक्के स्ट्राइक रेट. इथूनच निवडणुकीच्या विजयाचा सिलसिला सुरू होतो’, असं आदित्य ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा – ‘शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एमएसपी वाढवण्याचा प्रस्ताव : उपमुख्यमंत्री अजित पवार

दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेने १० पैकी १० जागांवर विजय मिळवला. यानंतर आता विजयी उमेदवार आज (२८ सप्टेंबर) मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.





