ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तेलंगण आणि आंध्र प्रदेशात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पाऊस

पुरामुळे राज्यातील अनेक जलाशयांच्या पाणीसाठ्यात वाढ

हैदराबाद : बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तेलंगण आणि आंध्र प्रदेशात शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून येथील अनेक नद्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळित झाले आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना परिस्थिचा आढावा घ्यायला सांगितला असून, नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आदेश दिले आहेत.

नद्यांना आलेल्या पुरामुळे राज्यातील अनेक जलाशयांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून, अनेक जलाशयांतून पाणी सोडण्यात येत असल्याने धरणक्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार या दोन्ही राज्यांत सोमवारी देखील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळेच येथील सर्व खासगी आणि सरकारी शाळांना सोमवारी सुटी देण्यात आली आहे. तेलंगणातील खम्मम,सूर्यापेट, वारंगळ, कमारेड्डी आणि मेहबूब नगर येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली.

तेलंगणातील अनेक रस्त्यांवर पुराचे पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच येथील जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्यातील सिंगरेनी परिसरात असलेल्या कोळशाच्या खाणींतील कोळसा उत्पादनावरही मुसळधार पावसाचा परिणाम झाला असून येथील कोळसा उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना मुसळधार पाऊस सुरू झाल्यापासून दररोज सुमारे चार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत असल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली. तेलंगणमधील सूर्यपेट जिल्ह्यातील हुजूरनगर येथे शनिवारी सर्वाधिक २९३ मिमी. पावसाची नोंद झाली. त्याचप्रमाणे चिलुकूर येथे २८२ मिमी. खम्मम येथील एर्रुपलेम येथे २१३ मिमी. पावसाची नोंद झाली.

आंध्र प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील नद्यांना पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे विविध घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशात अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली असली तरी, पुराचे पाणी अद्याप ओसरलेले नाही. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पूरस्थितीचा आढावा घेत योग्य त्या सूचना दिल्या असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

रेड्डींनी बोलावली बैठक
तेलंगणमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्‍वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेत सर्व अधिकाऱ्यांना सावध राहण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे सर्व सरकारी अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द करून त्यांना कामावर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. नागरिकांनी तातडीच्या कामाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कामासाठी घरातून बाहेर पडू नये असे आवाहन मुख्यमंत्री रेड्डी यांनी केले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील सर्व आमदारांनी आणि मंत्र्यांनी बचाव कार्यावर लक्ष ठेवण्याची सूचना मुख्यमंत्री रेड्डी यांनी दिली आहे.

मुसळधार पावसामुळे….
-तेलंगणातील मुलुगू जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद

-सम्मक्का-सरलम्मा यात्रा स्थगित

-दक्षिणमध्य रेल्वेच्या अनेक रेल्वेगाड्या रद्द

-महबुबाबाद येथील अनेक ठिकाणी रेल्वे रुळ पाण्याखाली

-विजयवाडा विभागातील ३० रेल्वे गाड्या रद्द

-रेल्वेरुळ पाण्याखाली गेल्याने विजयवाडा-काजीपेट मार्गावर २४ रेल्वे गाड्या अडकल्या

-प्रवाशांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी सरकारकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button