ताज्या घडामोडीपुणे

सार्वजनिक मंडळांची धामधूम लाडक्या गणरायाचे स्वागत धुमधडाक्यात

बहुतांश ठिकाणी मंडप उभारणी अंतिम टप्प्यात

पुणे : लाडक्या गणरायाचे स्वागत धुमधडाक्यात करण्यासाठी सार्वजनिक मंडळांची धामधूम सुरू झाली असून त्यासाठी मंडप उभारणीच्या कामांना वेग आला आहे. बहुतांश ठिकाणी मंडप उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे. उत्सवात पावसाची हजेरी लागण्याची शक्यता असल्याने बहुतेक मंडळांनी त्यासाठी खबरदारी घेतल्याचेही दिसून आले.

मंडपासाठी लागणारे वासे, बांबू, पत्रे, लोखंडी खांब मुंबई व इतर राज्यांतून मागवले जातात. मंडळाच्या देखाव्याच्या आवश्यकतेनुसार मंडपाची रचना केली जाते. मंडपाच्या आकाराप्रमाणे आणि त्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा आढावा घेऊन किमान ७० ते ८० हजार रुपयांपासून मंडप उभारणी होते. एक मंडप दोन- तीन दिवसांत पूर्ण केला जातो. त्यासाठी १०-१२ कर्मचारी काम करतात. या दिवसांत मंडप बांधणाऱ्या कुशल कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासतो. त्यामुळे बाजारभावापेक्षा अधिक पगार त्यांना द्यावा लागतो, असे काही व्यावसायिकांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

शहर आणि उपनगरांत सुमारे चार हजारांपेक्षा जास्त सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. तसेच सोसायट्यांमध्येही गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. तेथेही मंडप उभारावे लागतात. मंडप उभारणीच्या कामाचे नियोजन उत्सवाच्या आधी किमान एक महिना केले जाते. प्रत्यक्ष मंडप उभारणी उत्सवापूर्वी १०- १२ दिवस अगोदरच होते, अशीही माहिती व्यावसायिकांनी दिली.

परराज्यातून आणले जाते कापड

मंडपासाठी पत्रेही मोठ्या संख्येने लागतात. तसेच मंडपात विविध रंगांचे पडदे लागतात. त्यासाठीचे कापड प्रामुख्याने गुजरात, दिल्ली व उत्तर प्रदेशातून आणले जाते. काही ठिकाणी स्टेज उभारले जाते. त्यासाठी पायऱ्यांचीही गरज भासते. तसेच मंडपाच्या आवारात फ्लेक्सही मोठ्या संख्येने मंडळे लावतात. त्यासाठीही पडद्यांची व्यवस्था करावी लागते. महापालिकेच्या आदेशामुळे सिमेंटच्या रस्त्यांवर खड्डा खणता येत नाही. त्यामुळे ‘बेस प्लेट’चा आधार घेऊन तो उभारला जातो.

गणपती बाप्पा आम्हा व्यावसायिकांसाठी भरभराट आणि समृद्धी घेऊन येतात. वर्षभर व्यवसायात कितीही चढ-उतार आले तरी गणेशोत्सवामध्ये सगळ्याच व्यावसायिकांना ‘अच्छे दिन’ येतात. त्यामुळे आम्हाला काम करण्यासाठी हुरूप येतो व समाधान मिळते. गणरायाचे स्वागत व त्याच्यासाठी १० दिवस बसण्याची व्यवस्था करण्याची संधी मिळणे, हे आमचे भाग्य आहे. विविध देखाव्यांनुसार आम्ही मंडपाची उभारणी करतो. महापालिका आणि पोलिसांच्या सूचनांनुसार मंडपाचा आकार, त्यासाठी रस्ता आणि स्टेज उभारले जाते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button