ताज्या घडामोडीविदर्भ

मुक्या जनावराला वाचवण्यासाठी धावले प्रशासन 

कुडाळ येथे एका रेड्याला व २ शेळ्यांना मिळाले जीवदान

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात कालपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सतत पडणाऱ्या पावसाची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन सतर्कतेने परिस्थिती हाताळत आहे. जिल्ह्यात कोणतीही हानी होऊ नये यासाठी यंत्रणा कायम सतर्क आहे. अशातच आज सकाळी पोलीस पाटलांनी कुडाळ रेल्वे स्टेशन शेजारील सिद्धिविनायक हॉल परिसरात काही जनावरे पाण्यात अडकल्याचे कुडाळ उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत उपविभागीय अधिकारी श्रीमती ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार विरसिंग वसावे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, नायब तहसीलदार प्रतीक आढाव, एनडीआरएफचे पथक प्रमुख प्रमोद राय सतर्क झाले आणि एनडीआरएफचे पथक संबंधित ठिकाणी तात्काळ पोहोचले. घटनास्थळी पोहचताच एक म्हैस आणि एक रेडा पाण्यात अडकलेले पथकाला दिसले. म्हैस बांधलेली नसल्याने ती सुखरूप बाहेर पडली. परंतु रेडा दोरीने बांधलेला असल्याने त्याला काहीही हालचाल करता येत नव्हती.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या रेड्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी पथकाने पुराच्या पाण्यामध्ये बोटीने जाऊन रेड्याला बांधलेली दोरी तोडली आणि त्या रेड्याला सुखरूप बाहेर काढले. तसेच कुडाळ येथील गुलमोहर हॉटेल परिसरात पुराच्या पाण्यात २ शेळ्या अडकलेल्या आहेत. त्यांची देखील सुटका NDRF पथकाने केली आहे. नेहमी नागरिकांच्या मदतीला देवाप्रमाणे धावणाऱ्या एनडीआरएफच्या पथकाने आज मुक्या जनावराला देखील जीवदान दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्राण्यांना जन्मताच पाण्यात पोहता येते परंतु अनेक वेळा प्राण्यांचे मालक प्राण्यांना बांधून ठेवत असल्याने संकट समयी त्या प्राण्याला कोणत्याही प्रकारची हालचाल करता येत नाही आणि ते संकटात सापडतात. त्यामुळे मालकांनी जनावरांना बांधून ठेवू नये असेही आव्हान जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button