breaking-newsताज्या घडामोडीपुणे

आधुनिक राष्ट्र म्हणून संकल्पनांचे पुनर्मूल्यांकन करणे गरजेचे : रा.स्व.संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमूख सुनील आंबेकर

पुण्यात देवर्षी नारद माध्यम पुरस्कार प्रदान

पुणे : आपण आपल्या अनुभवांच्या आधारे विविध जीवनमूल्यांची व्याख्या केली आहे. पण आधुनिक राष्ट्र म्हणून पुढे जाताना अशा संकल्पनांचे पुनर्मूल्यांकन होणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमूख सुनील आंबेकर यांनी व्यक्त केले. सभ्यतेशी तडजोड करत आपण आधुनिक तंत्रज्ञान स्विकारले. मात्र, व्यवहारिक संस्कृतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात मानवी प्रज्ञेची आवश्यकता असल्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये देवर्षी नारद माध्यम पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि प्रसारमाध्यमे’ या विषयावर आंबेकर बोलत होते. यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत, विश्व संवाद केंद्र पुणेचे अध्यक्ष अभय कुलकर्णी आदि उपस्थित होते. कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार म्हणून ‘सकाळ माध्यम समुहा’चे संपादक सम्राट फडणीस यांना, आश्वासक पत्रकारितेसाठी ‘महाराष्ट्र टाईम्स’चे पुण्यातील बातमीदार प्रसाद पानसे आणि कोल्हापूर येथील ‘टोमॅटो एफएम’च्या कार्यकारी निर्मात्या रसिका कुलकर्णी, तर समाजमाध्यम (सोशल मिडिया) विभागात ‘मराठी किडा’ या चॅनलचे निर्माते सूरज खटावकर आणि प्रशांत दांडेकर यांना देवर्षी नारद माध्यम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आंबेकर पुढे म्हणाले की,अस्तित्वाच्या संकटातून नव्हे तर लोककल्याणकारी आणि सकारात्मक दृष्टीकोणातून भारत ‘राष्ट्र’ म्हणून उभे राहिले.”राष्ट्र म्हणजे भाषा किंवा धर्माच्या आधारे राज्यांचा संघ अशी संकल्पना रूजली आहे. मात्र भारत म्हणून आपण या पलीकडील समान सूत्रांच्या आधारे एकत्र आलो आहोत. पाश्चिमात्य दृष्टीकोनातून धर्म, संस्कृती, परंपरा यांची व्याख्या करण्यात आली आहे. नव्या पिढीने डोळसपणे पाहत आशा संकल्पनांना आव्हान द्यायला हवे.” असेही ते म्हणाले.

हेही वाचा     –      ‘माझा हातात सत्ता द्या, ४८ तासांत संपूर्ण महाराष्ट्र..’; बदलापूर घटनेवरून राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य 

यावेळी सम्राट फडणीस म्हणाले, “पत्रकारिता सध्या संक्रमणाच्या अवस्थेतून जात आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि नवी कल्पना स्विकारताना पत्रकारितेला प्रयत्नपूर्वक दिशा द्यायला हवी.”

प्रसाद पानसे म्हणाले,”पत्रकारितेचे मूल्यमापन माध्यम समुहाबरोबरच समाजही करत असतो. अशा पुरस्कारांच्या माध्यमातून आपल्या कार्याची दखल घेतल्याचा आनंद आहे.” नभोवाणीच्या माध्यमातूनही समाज प्रबोधनाचे प्रभावी कार्य करता येते. या पुरस्कारामुळे ही जबाबदारी अधिक वाढल्याची भावना रसिका कुलकर्णी यांनी व्यक्त केली. तर सोशल मिडीयावर इन्फ्ल्यूयन्सर म्हणून कार्य करताना आपल्या ममूल्यांशी नाळ घट्ट हवी, असे खटावकर म्हणाले.

माध्यमातील राष्ट्रीय विचारांची गरज यावेळी अभय कुलकर्णी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, राष्ट्रीय विचारांचे जागर करण्याचे काम विश्व संवाद केंद्र करत आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यात माध्यमांमध्ये राष्ट्रीय विचार रूजविणे गरजेचे आहे.

कार्यक्रमात पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनित भावे, पत्रकार संघाच्या सरचिटणीस मीनाक्षी गुरव, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत,कार्यवाह आनंद काटीकर यांचा नियुक्तीबद्दल सत्कार करण्यात आला. दीपा भांडारे यांनी नारद स्तवन सादर केले. दरम्यान कार्यक्रमापूर्वी आंबेकर यांनी फर्ग्युसन महाविद्यालय परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या खोलीस भेट देऊन सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला देवर्षी नारद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सूत्रसंचालन शिल्पा निंबाळकर यांनी केले. कार्यवाह आनंद काटीकर यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button