चार भिंतींच्या आत मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा; ठाकरे गटाची भूमिका

मुंबई | महाविकास आघाडीचा नुकताच मेळावा झाला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याती मागणी करत त्या चेहऱ्याला आपला पाठिंबा असल्याचं म्हटलं. मात्र, महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी याबाबत कोणतही भाष्य केलं नाही. त्यानंतर पुन्हा एकदा चार भिंतीच्या आड तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवावा, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतल्याची चर्चा आहे.
ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री झालं तर पाडापाडी होते असं उद्धव ठाकरे म्हणाले परंतु असं कधी होत नाही. त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले आणि आम्ही आमचे मत व्यक्त केले. मुख्यमंत्री इथं ठरत नसतो तर तो श्रेष्ठी ठरवत असतात. पण एक गोष्ट चांगली झाली की लोकांमध्ये, माध्यमांमध्ये सरकार हे महाविकास आघाडीचेच येणार असं वातावरण तयार झालं. निवडणूक होऊ द्या, जिंकून द्या, किती आमदार निवडून येतायेत ते बघू त्यानंतर सरकार कोण चालवेल हे नंतर ठरवता येईल. जागावाटप आणि निवडणुकीच्या कामाला लागणं हाच आमच्यासमोरचा विषय आहे. मुख्यमंत्रिपदाचा विषयच नाही. निवडणूक जिंकल्यानंतरच मुख्यमंत्री ठरवला जाईल असं स्पष्ट विधान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी मविआच्या मेळाव्यानंतर केले होते.
हेही वाचा – ..तर मुख्यमंत्रीही विकृत मानसिकतेचे; बदलापूर प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
मविआ मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं होते?
आपल्यात काड्या घालणारे काही लोक महायुतीत बसलेले आहेत. ते म्हणतात की, आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? येथे शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण हे देखील बसलेले आहेत. मी सांगतो मुख्यमंत्रिपदासाठी तुमच्यापैकी कोणाचाही चेहरा असेल तर तुम्ही जाहीर करा, मी पाठिंबा देतो. जागावाटपावरून भांडण करू नका, वज्रमूठ कामात दिसली पाहिजे. भाजपसोबत जो धोका घेतला तो नको मला. ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असे ठरवले जायचे. पण त्यात एकमेकांच्या जागा पाडल्या जायच्या, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होते.





