ताज्या घडामोडीमुंबई

बदलापूर प्रकरण : अक्षय शिंदेचे तीन वेळा लग्न झाल्याची माहिती, तीनही पत्नी सोडून गेल्या

बदलापूर पूर्वेतील खरवई गावात राहणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेचे वय केवळ 24 वर्षे

बदलापुर : बदलापुरातील नामांकीत शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याच्याबद्दल धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अक्षय शिंदे याचे तीन वेळा लग्न झाल्याची माहिती आता समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर पूर्वेतील खरवई गावात राहणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेचे वय केवळ 24 वर्षे असले तरी त्याचे आधीच तीन वेळा लग्न झाले होते. मात्र त्याच्या तीनही पत्नी त्याला सोडून गेल्या आहेत. अक्षयचे शिक्षण दहावीपर्यंतच झाले आहे. तो बदलापूरमधील एका शाळेत शिपाई म्हणून काम करत होता. याआधी तो एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. त्यानंतर एका कंत्राटाद्वारे त्याला आदर्श शाळेत शिपाई म्हणून नोकरी मिळाली.

अक्षय कर्नाटकातील गुलबर्गा गावातील असून त्याचा जन्म मात्र बदलापूरमधील खरवई गावात झाला. तो खरवई गावातील एका चाळीत आपल्या आई-वडील, भाऊ आणि भावाच्या पत्नीसोबत राहत होता. मात्र गावकऱ्यांनी त्याच्या घरावर हल्ला करून तोडफोड केली आहे.

अक्षयचे नातेवाईक देखील शेजारीच राहत होते, त्यांच्याही घराची तोडफोड गावकऱ्यांनी केली. या घटनेनंतर अक्षय आणि त्याचे कुटुंब खरवई गावातून गायब झाले आहेत. गावातील महिलांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, अक्षयचे तीन वेळा लग्न झाले होते. पण कोणतीही पत्नी सध्या त्याच्यासोबत राहत नाही.

आरोपी अक्षय शिंदे याने बदलापुरातील नामांकीत शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केला. संबंधित घटना या 13 आणि 14 ऑगस्टला घडल्या. या घटना घडल्यानंतर एका चिमुकलीने घरी गेल्यानंतर आपल्या आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. चिमुकलीला स्थानिक डॉक्टरांकडे नेलं असता डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी मुलीच्या आई-वडिलांना याबाबत माहिती दिली. दरम्यान, दुसऱ्या चिमुकलीने शाळेत जाण्यास नकार दिला. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी तिचं समुपदेशन केलं असता मुलीने घडलेला प्रकार सांगितला. तिचीदेखील मेडिकल चाचणी केली असता तिच्यासोबत संतापजनक प्रकार घडल्याचं पालकांच्या लक्षात आलं.

दोन्ही मुलींच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पण पोलिसांनी जवळपास 12 तास गुन्हा दाखल केला नाही, असा आरोप केला जातोय. मनसेने हस्तक्षेप केल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांची कारवाई उदासीन वाटत असल्यामुळे बदलापुरात 20 ऑगस्टला नागरिकांचा मोठा उद्रेक बघायला मिळाला. नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्टेशनचं कामकाज ठप्प करत दिवसभर रेल्वे वाहतूक बंद पाडली. नागरिकांच्या उद्रेकानंतर या घटनेचं गांभीर्य प्रशासनाला झालं आणि या प्रकरणात जलद गतीने निर्णय घेण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button