ताज्या घडामोडीमुंबईराजकारण

दिलीप सोपल शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश करणार

राजकीय अज्ञातवासात गेलेले दिलीप सोपल पुन्हा एकदा कमबॅक करण्यास उत्सुक

मुंबई : दिलीप सोपल म्हणजे राज्याच्या राजकारणातील दिलखुलास, प्रचंड मिश्किल, हजरजबाबी आणि बेरकी व्यक्तिमत्व. आपल्या भाषणातून प्रतिस्पर्ध्यांवर शेलक्या शब्दात बाण सोडून घायाळ करणे असो वा पक्षांतर्गत विरोधकांना लगावलेल्या कोपरखळ्या असो, दिलीपरावांचे भाषण म्हणजे कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांसाठी पर्वणीच… गेली ५ वर्षे राजकीय अज्ञातवासात गेलेले सोपल पुन्हा एकदा कमबॅक करण्यास उत्सुक आहेत. त्याची सुरुवात झालीये, देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बार्शीतील भेटीने!

शरद पवार यांचा रविवारी बार्शीत शेतकरी मेळावा संपन्न झाला. या दौऱ्यात त्यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. सध्या शिवसेना ठाकरे गटात असलेल्या दिलीप सोपल यांचीही त्यांनी आवर्जून भेट घेतली. बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे अस्वस्थ सोपल शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले. त्यांच्या निर्णयाने झाकोळलेल्या राजकीय कारकीर्दीला पुन्हा उभारी मिळणार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत आमदार राजाभाऊ राऊत यांच्याविरोधात सोपल बार्शीतून तुतारी फुंकतील हे ओघाने आलेच! काहीच दिवसांत त्यांच्या प्रवेशाविषयी घोषणा करण्यात येईल, अशी माहिती आहे.

विधानसभा निवडणूक २०१९ च्या तोंडावर सोपल यांनी शरद पवार यांची साथ सोडून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. परंतु त्यावेळसचे अपक्ष उमेदवार आणि आत्ताचे जवळपास भाजपवासी राजाभाऊ राऊत यांनी सोपल यांचा पराभव केला. मध्यंतरी सोपल यांच्या आर्यन साखर कारखान्याच्या एफआरपीची बिले थकीत होती. याविषयीची चौकशीही सुरू होती. त्याचमुळे पराभवानंतर सोपल काहीसे शांत होते. शिवसेनेच्या कोणत्याही कार्यक्रमांना वा पक्षाच्या बैठकींनाही सोपल उपस्थिती लावत नव्हते. सरकारविरोधात काही भूमिका घेतली तर कारवाईची त्यांना भीती होती. लोकसभा निवडणुकीतही अगदी शेवटच्या टप्प्यात त्यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी खुमासदार भाषण ठोकून एका भाषणात मते कशी वळवावीत, याचा नमुना दाखवला.

दिलीप सोपल यांचे व्यक्तिमत्व म्हणजे सामान्य माणसांमध्ये रमणारे, सरकारविषयी सामान्यांमध्ये काय भावना आहे? हे यथोचित सांगणारे. सरकारचे निर्णय आणि भूमिका यांची सोप्या शब्दात चिरफाड करून जनसामान्यांमध्ये सरकारविरोधी लाट कशी निर्माण करायची हे सोपल यांना पक्के ठावूक आहे. लोकसभा निवडणूक २०१९ ला त्यांनी आपल्या वाणीने राष्ट्रवादीच्या अनेक सभांमधून श्रोत्यांची मने जिंकली. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. राष्ट्रवादीत फूट पडून काका-पुतण्यांनी वेगळी चूल मांडली आहे. अशा काळात सोपल यांच्यासारखे नेते शरद पवार यांच्या साथीला आले, तर विधानसभा निवडणुकीत ‘तुतारी’चा आवाज नक्की वाढेल, असे राजकीय विश्लेषक सांगतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button