ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मिलच्या मुद्द्यावरुन रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात वार-पलटवार

अमरावतीत राजकारण तापनार, बच्चू कडू सत्ता परिवर्तनासाठी सुद्धा पैसे घेतात

अमरावती : आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात वार-पलटवार सुरु आहे. मिलच्या मुद्द्यावरुन दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार शा‍ब्दिक चकमक सुरु आहे. “फिनले मिलच्या मुद्द्यावर एक वर्षापूर्वी बैठक झाली होती. मी त्याबाबत विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. आपण असं म्हटलं होतं की, एकतर राज्य सरकारने मिल हातात घ्यावी किंवा केंद्राने तरी मिल चालू करावी. केंद्र सरकारची पैसे द्यायची तयारी नसेल तर राज्य सरकारने पैसे द्यावे. आमची मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीला आता एक वर्ष झाला आहे. मी मुख्य़मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवलं होतं. एक वर्षाअगोदरच आम्ही 20 कोटी रुपये देतो, असा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला होता. त्याला एक वर्ष झाला. केंद्राने तो प्रस्ताव स्वीकारला नाही. आता त्याचं विनाकारण श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जातोय तो अतिशय निंदनीय आहे. स्वत:च्या मतदारसंघातील दोन मिल बंद आहेत. विजय मिल बंद आहे आणि अमरावती गोल मिल बंद आहे. तिथले कामगार उपाशी मरत आहेत. ना त्यांना घर मिळालं, ना जागा मिळालं, तिथे हे राणा दाम्पत्य काही करु शकले नाहीत”, असा आरोप बच्चू कडू यांनी केला.

“आम्ही ज्या मिलसाठी प्रयत्न केले, कामगारांना फक्त 50 टक्के पगार मिळत होता, मी राज्यमंत्री असताना हा प्रस्ताव पाठवला. त्याला दोन वर्ष झाली. कामगारांना 2020 ते 2023 या काळात शंभर टक्के पगार मिळत होता. नंतर खासदार असूनसुद्धा नवनीत राणा यांनी कामगारांसाठी लोकसभेत एक प्रश्न सरकारला विचारला नाही. कामगारांसाठी काल बैठक झाली तेव्हा मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून दिलं की, कामगार कायद्यानुसार शंभर टक्के पगार देणं गरजेचं आहे. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी कबूल केलं की, आम्ही शंभर टक्के पगार देण्यासाठी भाग पाडू. त्यामुळे आता कामागारांना शंभर टक्के पगार मिळेल. कामगारांना शंभर टक्के पगार मिळाले तर आमच्या कामगारांच्या किमान आत्महत्या होणार नाहीत”, असं बच्चू कडू म्हणाले.

‘याची लाज वाटणं गरजेचं’, बच्चू कडूंचा घणाघात
“केंद्राचं मिल सुरु करण्याबाबत धोरण आहे. हा पूर्ण विषय केंद्राच्या अधीन आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: बैठकीत हा विषय केंद्राचा असल्यामुळे तिथून विषय सोडवू असं आश्वासन दिलं आहे. पण तरीही माझ्या डोक्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न केला जातोय. हा प्रकार अतिशय निंदनीय आहे. मला वाटतं, तुम्ही खासदार होत्या, तुमचं सरकार होतं. मिल काँग्रेसच्या काळात सुरु झाली आणि भाजपच्या काळात बंद झाली याची लाज वाटणं गरजेचं आहे. चार वर्षांपासून मिल बंद आहे. आपण काहीच प्रयत्न केला नाही”, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.

“केंद्र सरकार धोरण आखत नाही तोपर्यंत राज्य सरकार काहीच करु शकत नाही. पण लोकांना किती बुद्धू बनवायचं, किती लोकांना मूर्ख बनवायचं याचा काही लिमिट असलं पाहिजे ना. राज्य सरकारने उद्या निर्णय घेतला की, मी मिल सुरु करतो तर करु शकणार आहे का? नाही करु शकत. जोपर्यंत केंद्र सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. देशभरात 26 मिल बंद आहेत. त्यामध्ये राज्यातील 2 मिलचा समावेश आहे. केंद्र सरकार याबाबत निर्णय घेणार आहे. ते स्वागतार्ह आहे. पण जाणूनबुजून मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. स्वत:च्या मतदारसंघात दोन मिल बंद आहेत. त्यासाठी काही करु शकले नाही आणि आता फिनले मिल सुरु करायला निघाले म्हणजे हा मुर्खपणा लोकांच्या लक्षात येईल”, असा घणाघात बच्चू कडू यांनी केला.

आमदार रवी राणा यांचा पलटवार
आमदार रवी राणी यांनी बच्चू कडू यांना प्रत्युत्तर दिलं. “फिनले मिल बंद पडली तेव्हा अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आली. तेव्हा माजी खासदार नवनीत राणा यांनी ती फिनले मिल सुरू करण्यासाठी प्रयत्न केला. त्यासोबतच आता काही दिवसांआधी मी त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत मंत्रालयात बैठकी घेतल्या. त्या ठिकाणी निर्णय झाला की फिनले मिल सुरू करायची आहे. मी आणि नवनीत राणा यांनी केलेल्या कामांमुळे राज्य सरकारने मिल चालवण्यासाठी घेण्याकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राला पत्र पाठवलं. मात्र आज बच्चू कडू सांगतात की ते काम मी करून आणलं. माझं त्यांना आवाहन आहे की, त्यांनी केलेला पाठपुरावा आणि नवनीत राणा यांनी केलेला पाठपुरावा, स्वतः मी केलेला पाठपुरावा तो आणावा. मी जिथे म्हणाल तिथे बसायला तयार आहे. दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे”, अशा शब्दांत रवी राणा यांनी बच्चू कडू यांना प्रत्युत्तर दिलं.

‘बच्चू कडू सत्ता परिवर्तनासाठी सुद्धा पैसे घेतात’
“अचलपूर मतदारसंघांमध्ये बच्चू कडू यांनी एक सुद्धा उद्योग आणला नाही. आज अचलपूर मतदारसंघाचा विकास खड्ड्यात खड्डे झाला आहे. बच्चू कडू वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन नेत्यांना शिव्या देतात. त्या ठिकाणी मोठमोठे आश्वासन देतात, नौटंकी करतात. स्वतःच्या मतदारसंघांमध्ये का दिवा लावला नाही? बच्चू कडू सत्ता परिवर्तनासाठी सुद्धा पैसे घेतात, एखादा नेता पाडण्यासाठी पैसे घेतो, आणि निवडून आणण्यासाठी सुद्धा पैसे घेतो. नवनीत राणांच्या पराभवामध्ये माझ्याकडून विड्रॉल करण्यासाठी बच्चू कडू यांनी पैसे मागितले होते. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. याचा पूर्ण हिशोब अचलपूर मतदारसंघाची जनता घेणार आहे”, असं रवी राणा म्हणाले.

‘बच्चू कडू आयत्या बिडावर नागोबा’
“अचलपूर मतदारसंघामध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या माध्यमातून फिनले मिलची सुरुवात झाली होती. या मिलच्या माध्यमातून 4000 लोकांना रोजगार देण्यात आला होता. पण गेल्या चार-पाच वर्षांपासून ती मिल बंद पडली होती. दरम्यान नवनीत राणा यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासोबत पत्र व्यवहार केला होता. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पत्रव्यवहार केला. पाच वर्षापासून कामगारांवर उपासमारीची वेळ आली. लोक बेरोजगार झाले आहेत. पण बच्चू कडू कधी भेटीला गेले नाहीत. कुठल्या कामगाराविषयी सहानुभूती बच्चू कडू यांना वाटत नाही. बच्चू कडू आयत्या बिडावर नागोबा झाले. पालकमंत्र्यांच्या बाजूला बसून हुशारी दाखवत आहेत”, अशी टीका रवी राणा यांनी केली.

‘बच्चू कडू यांनी दालमिलची सबसिडी खाल्ली’
“बच्चू कडूंनी अचलपूर मतदारसंघांमध्ये एक उद्योग दाखवावा. बडनेरा मतदारसंघांमध्ये रेल्वे वॅगन फॅक्टरी आहे. विविध उद्योगांनी शासकीय मेडिकल कॉलेज आणलं. मोठे प्रकल्प आम्ही आणले. राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यावर बच्चू कडू टीका करतात. नवनीत राणा यांना पाडण्यासाठी बच्चू कडू यांनी सुपारी घेतली. माघार घेण्यासाठी मला त्यांनी पैसे मागितले. बच्चू कडू यांनी दालमिलची सबसिडी खाल्ली आहे”, असा आरोप रवी राणा यांनी केला.

“बच्चू कडू खोके घेऊन सत्ता परिवर्तन करतात. विधानपरिषदमध्ये पैसे घेतो, राज्यसभा मध्ये बच्चू कडू पैसे घेतो आणि त्या सत्तेला पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू पैसे घेतो. मी आमदार झाल्यावर माझ्याकडे उद्योग बंद पडला असेल तर बच्चू कडूंनी दाखवावं. मी सर्व कागद घेऊन येतो. बच्चू कडूंनी देखील सर्व पाठपुराचे कागद घेऊन यावे दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या”, असं रवी राणा म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button