‘उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणाबाबत घेतलेली भूमिका दुर्दैवी’; प्रकाश आंबेडकरांची टीका
![Prakash Ambedkar said that Uddhav Thackeray's stance on Maratha reservation was unfortunate](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/Prakash-Ambedkar-and-Uddhav-Thackeray-780x470.jpg)
मुंबई | राज्यात आरक्षणासाठी लढणाऱ्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जाऊन आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी करावी, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली. यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांन नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणाबाबत घेतलेली भूमिका दुर्दैवी असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणा देण्याच्या मनोज जरांगे यांच्या मागणीबाबत उद्धव ठाकरेंनी मांडलेली भूमिका अतिशय दुर्दैवी आहे. मुळात उद्धव ठाकरे यांनी आपण या मागणीच्या बाजुने आहोत की विरोधात हे स्पष्ट न करता, पंतप्रधान मोदींकडे जाण्याचा सल्ला दिला आहे. याचा अर्थ ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी मोदींकडे जा, असं उद्धव ठाकरे सूचवत आहेत. उद्धव ठाकरेंची ही भूमिका दोन समाजातील भांडण मिटवण्याऐवजी भांडणं लावण्याचा प्रकार आहे. यामुळे महाराष्ट्रातील शांतता भंग होऊ शकते, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – Wayanad Landslide | भूस्खलनामुळे झालेल्या दुर्घटनेतल्या बळींची संख्या १४८, मदत आणि बचावकार्य सुरु
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
आरक्षणाच्याबाबतीत राजकीय नेत्यांच्या भूमिकेपेक्षा, सरकारने सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं आणि सर्वमान्य तोडगा काढावा. शिवसेनेचा ( उद्धव ठाकरे गट ) त्याला पाठिंबा असेल. आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकार सोडवू शकत नाही. त्यामुळे सर्वच समाजाला पंतप्रधान मोदींकडे हा प्रश्न मांडावा लागेल. मी सर्व समाजाच्या लोकांना विनंती करतो, की त्यांनी राज्यात आरक्षणासाठी भांडण केल्यापेक्षा दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींना यात लक्ष घालण्याची विनंती करावी, असं उद्धव ठाकरे म्हणाले.