अंतापुरकर लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा
राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणूकीत जितेश अंतापूरकरांवर क्रॉस व्होटिंगचा आरोप
![Marathwada, MLA, Jitesh Antapurkar, Cross Voting, Discussion, Ashok Chavan, Gift,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/mumbai-13-780x470.jpg)
मुंबई : वृत्त वाहिन्यांचे कॅमेरे पाहून काँग्रेसचे देगलूर मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी अक्षरशः पळ काढला. पण माध्यम प्रतिनिधींनीही अंतापूरकर यांचा दूरपर्यंत पाठलाग करत त्यांची प्रतिक्रिया मिळवलीच. यावेळी त्यांनी आपण काँग्रेसमध्येच असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अंतापूरकर काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. राज्यसभा निवडणुकीपासूनच ही चर्चा सुरू होती. त्यावर आता अंतापूरकर यांनीच पडदा टाकला आहे.
राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणूकीत जितेश अंतापूरकर त्यांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप आहे. शिवाय चार दिवसांपूर्वी जितेश अंतापूरकर यांनी मुंबईत भाजपा खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती. त्यामुळे अंतापूरकर हे भाजपा जाणार असल्याची चर्चा होती. आज नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी ते आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माध्यम प्रतिनिधींनी जितेश अंतापूरकर यांना प्रतिक्रिया घेण्यासाठी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे पाहून अंतापूरकर यांनी अक्षरश: पळ काढला. मात्र, मीडियानेही त्यांचा पाठलाग करत अखेर त्यांना गाठलं आणि त्यांची प्रतिक्रिया घेतली.
निश्चितच, काँग्रेसमध्येच आहे
मीडियाने पाठलाग करून गाठल्यानंतर अंतापूरकर यांचाही नाईलाज झाला. त्यांनी या प्रकरणावर भाष्य केलं. आरोप हे होत असतात. माझ्यावर झालेल्या आरोपांबाबत मी सविस्तर बोलणार आहे, असं त्यांनी सांगितलं. यावेली त्यांना आपण काँग्रेसमध्ये आहात का? असा सवाल करण्यात आला. त्यावर निश्चितचं. मी काँग्रेसमध्येच आहे, असं जितेश अंतापूरकर यांनी स्पष्ट केलं.
चव्हाणांशी कौटुंबिक संबंध
क्रॉस व्होटिंगच्या आरोपाबाबत त्यांना विचारण्यात आलं. त्यावर आपण पुराव्यानिशी बोलू, असं ते म्हणाले. मतदारसंघातील विकासाच्या कामासंदर्भात मी अशोक चव्हाण यांची भेट घेतली. त्यांचे आणि माझे कौटुंबिक संबंध आहेत. शिवाय ते जिल्ह्याचे नेते आहेत. त्यामुळे भेट घेऊन त्यांच्याशी कामावर चर्चा केली, असं अंतापूरकर म्हणाले.
पक्षाची ताकद वाढेल
दरम्यान, अंतापुरकर यांनी भाजप नेत्यांची भेट घेतल्यानंतर ते लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा नांदेड जिल्ह्यात सुरू आहेत. अंतापुरकर भाजपात आले तर पक्षाची ताकत वाढेल. काही नुकसान होणार नसल्याची प्रतिक्रिया माजी आमदार सुभाष साबने यांनी दिलीय. पक्षाने ज्याला उमेदवारी दिली, त्याच्या पाठीशी उभे राहू. पक्षाने दिलेल्या अनेक जबाबदाऱ्या मी व्यवस्थितपणे पार पडल्या आहेत. देगलूर बिलोली मतदारसंघात बांधणी केली आहे हे सर्वांना माहीत आहे. मला विश्वास आहे की येणाऱ्या विधानसभेत पक्ष मला उमेदवारी देईल, असंही साबणे म्हणाले.