breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या; एम. व्यंकटेशन

पुणे | नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्वाचे असून प्रत्यक्ष कामातून ते समाजासमोर आदर्श उभा करत असतात. सेवा बजावताना या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देऊन त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी पुढाकार घ्यावा, अशी सूचना राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशन यांनी केली.

एम. व्यंकटेशन यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस भेट देऊन पिंपरी चिंचवड महापालिका सेवेत कायम तसेच कंत्राटी असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांशी संबंधित विविध विषयांचा महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस अध्यक्षांचे खाजगी प्रधान सचिव शशांक सिंह, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे आदी उपस्थित होते.

सफाई कर्मचाऱ्यांच्या तक्रारी वेळेत सोडविण्याचे निर्देश देऊन एम. व्यंकटेशन म्हणाले, सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत अदा करावे, सफाई कर्मचाऱ्यांना वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणांचे वितरण विहीत वेळेत करावे. सफाई कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा काढून त्यांची आरोग्य तपासणी देखील करावी. प्रत्येक सफाई कर्मचाऱ्यांच्या ओळखपत्रावर त्यांच्या रक्तगटासह विमा पॉलिसी क्रमांक, आपत्कालीन संपर्क क्रमांक आदी महत्वाच्या बाबी आवर्जून नमूद कराव्यात.

सर्व कर्मचाऱ्यांना वेतन प्रमाणपत्र वेळेत देण्यात यावे. वारसाहक्क आणि अनुकंपा तत्वावर सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना देण्यात येणारे लाभ आणि नोकरी याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसांना माहिती देऊन अशी प्रकरणे वेळेत निकाली काढावीत. महिला विषयक तक्रार निवारण करण्यासाठी विशाखा समितीबद्दल सर्व महिला सफाई कर्मचाऱ्यांना माहिती अवगत करावी अशा सुचनाही त्यांनी दिल्या. विविध संघटनाकडून बैठकीत प्राप्त झालेल्या सूचनांबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देशदेखील त्यांनी यावेळी दिले.

महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिका सफाई कर्मचाऱ्यांना देत असलेल्या विविध सेवा सुविधा आणि योजनांबद्दल माहिती दिली. कोणतीही प्रक्रिया राबविताना त्यातील उणीवा दूर करणे आवश्यक असते. सफाई कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील सर्व समस्या आणि त्यांना उद्भवणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध असून त्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असे आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा      –      Pune | खडकवासला धरणाचे दरवाजे उघडले; गावांना सतर्कतेचा इशारा 

पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेच्यावतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानातील सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान उल्लेखनीय होते, त्यामुळे शहराचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत झाली आहे. सफाई कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत असून त्यांना विविध सुविधा देण्यासाठीदेखील महापालिकेने नियोजन केले आहे. या सफाई कर्मचाऱ्यांच्या जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवित असून त्यांच्या पाल्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध शैक्षणिक कौशल्य विकास अभ्यासक्रमाचे मोफत कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत, अशी माहितीही शेखर सिंह यांनी दिली.

विजयकुमार खोराटे यांनी सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत सादरीकरणाद्वारे माहिती देवून सफाई कर्मचाऱ्यांसाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करणे, वैयक्तिक संरक्षणात्मक साहित्याचे वाटप वेळेत करणे आदी बाबींवर महापालिकेने लक्ष केंद्रित केल्याचे सांगितले.

महापालिकेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना, आरोग्य विमा योजना, श्रमसाफल्य योजना, शैक्षणिक आर्थिक सहाय्य योजना तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ सफाई कर्मचाऱ्यांना देण्यासाठी महापालिकेने केलेल्या कार्यवाहीची माहितीदेखील त्यांनी दिली.

यावेळी वारसा हक्क आणि अनुकंपा तत्त्वावर ३ सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना महापालिका सेवेत घेण्याबाबतचे नियुक्तीपत्र एम. व्यंकटेशन यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button