‘महाराष्ट्रात भाजपसमोर उद्धव ठाकरे हेच मोठे आव्हान’; सुषमा अंधारे
पुणे : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हेच सर्वांत मोठे आव्हान आहे. अमित शहा यांनी पुण्यात येऊन जी मुक्ताफळे उधळली आहेत, त्यावरून हे स्पष्ट झाले आहे. त्यांना महाराष्ट्रात आल्यानंतर आपले भाषण चुरचुरीत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव घ्यावे लागत आहे. त्याशिवाय त्यांना भाषणाची सुरूवात करता येत नाही. भाषण संपवता ही येत नाही. त्यांनी भाषणावेळी वापरलेली भाषा दुदैवी असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत केला.
पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे बोलत होत्या. अंधारे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा हे दोघेही एकसारखंच अघळपघळ बोलतात. देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील अधिवेशनात ज्याप्रकारे भूमिका मांडली. ते पाहता फडणवीस हेच फेक नरेटिव्हचे सर्वात मोठे केंद्र असल्यासारखे वाटतात.
हेही वाचा – लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार? अजित पवारांनी थेट तारीखच सांगितली
भाजप पक्ष कायमच हिंसा करतो. इथला हिंदू हिंसक नाही. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक म्हणजे सकल हिंदू अशी भाजपची समजूत आहे. राज्यातील मराठा आणि ओबीसी समाजाला भाजप का खेळवत आहे? राज्यात जातीय विषपेरणी करू नका,आरक्षणाचा तोडगा काढा. दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरु आहे. भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी लोकसभेत मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मांडावा. तुमची नियत मराठा समाजाला कळू द्या, असे सुषमा अंधारे यांनी यावेळी म्हटले.
अमित शहा यांनी भाजपच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांचा उल्लेख औरंगजेब फॅन्स क्लबचे अध्यक्ष असा केला होता. त्याला उत्तर देताना सुषमा अंधारे यांनी म्हटले की, आम्हाला अमित शहा यांच्यावर बोलायचे नाही. तडीपार लोकांनी महाराष्ट्रात येऊन आम्हाला शहाणपणा सांगण्याची गरज नाही. आम्ही कोण आहोत, आम्ही काय आहोत? याचं सर्टिफिकेट गुजरातच्या तडीपार माणसाकडून घेण्याची गरज वाटत नाही. ज्यांच्या हातावर जस्टिस लोया यांच्या खुनाचे डाग आहेत, त्यांनी आम्हाला सर्टिफिकेट देऊ नये, अशी टीका अंधारे यांनी यावेळी केली.
सुषमा अंधारे यांनी खोचक शैलीत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या दोघांची जन्म तारीख 1 एप्रिल असावी, त्यांच्या वागण्यातून ते दिसतं. फडणवीस गृहमंत्री आहे की ठोक मंत्री आहेत. कुंपणच शेत खात असेल तर कसं होणार, असा सवालही सुषमा अंधारे यांनी यावेळी उपस्थित केला.