ताज्या घडामोडीमुंबई

वरळी अपघात प्रकरणातील आरोपी मिहीर शाहला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

अपघातानंतर मिहीर फरार, दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर मिहीरला अटक 

मुंबई : मुंबईतील वरळी अपघात प्रकरणातील प्रमुख आरोपी मिहीर शाह याला पोलिसांनी आज (१६ जुलै) पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर केलं. न्यायालयाने सर्व पुरावे तपासून, मिहीरने पोलिसांना दिलेला कबुलीजबाब वाचून त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तो आता ३० जुलैपर्यंत कोठडीत राहील. मिहीर शाह याने ७ जुलै रोजी (रविवारी) पहाटे वरळी परिसरात मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे बीएमडब्ल्यू (BMW) कार चालवत एका दाम्पत्याला उडवलं होतं. वरळीतील रहिवासी कावेरी नाखवा आणि प्रदीप नाखवा या दोघांना त्याच्या कारने उडवलं होतं. यात प्रदीप नाखवा हे एका बाजूला पडले. तर कावेरी नाखवांना मिहीरने कारबरोबर फरपटत नेलं. या भयंकर अपघातात कावेरी नाखवांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या अपघातानंतर मिहीर फरार होता. मात्र दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर (९ जुलै) मिहीरला अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केलं होतं. न्यायालयाने अधिक चौकशीसाठी त्याची १६ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. त्यानंतर आज पोलिसांनी पुन्हा एकदा त्याला न्यायालयासमोर हजर केलं. यावेळी पोलिसांनी मिहीरची आणखी १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी मागितली, न्यायालयाने ती मंजूर केली आहे.

६० तासांच्या शोधमोहिमेनंतर अटक
अपघात झाल्यानंतर मिहीरने पलायन केलं होतं. तीन दिवस पोलीस त्याच्या मागावर होते. दाढी व केस कापून मिहीर फरार झाला होता, त्याने फोनही बंद ठेवला होता. मात्र गुन्हे शाखेच्या पथकाने ६० तासांच्या शोधमोहिमेनंतर त्याला अटक केली. त्याची आई आणि दोन मोठ्या बहिणींनी त्याला फरार होण्यात व लपण्यासाठी मदत केली होती. पोलिसांनी मिहीरला अटक केल्यानंतर या तिघींनाही ताब्यात घेतलं होतं.

वरळीतील ॲट्रिया मॉलजवळ हा अपघात झाला होता. मॉलजवळच असलेल्या वरळी कोळीवाड्यात नाखवा दाम्पत्य राहत असून ते सकाळी ससून डॉकला मासे खरेदी करण्यासाठी गेले होते. मासे घेऊन घरी परतत असताना मिहीरच्या कारने त्यांना धडक दिली. कारच्या धडकेनंतर प्रदीप नाखवा हे एका बाजूला पडले तर मिहीर कावेरी नाखवांना कारबरोबर फरपटत घेऊन गेला. यात कावेरी नाखवांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पोलीस चौकशीत मिहीरने काय सांगितलं?
मिहीर शाहला मद्यप्राशन करण्याचं व्यसन आहे. त्याने स्वतःच पोलीस चौकशीत याची कबुली दिली आहे. अटक केल्यानंतर त्याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या दरम्यान त्याची जी चौकशी झाली त्या चौकशीत त्याने मद्यप्राशन करण्याच्या सवयीबद्दल सांगितलं होतं. अपघात केल्यानंतर मिहीर शाहने वरळीतून पळ काढला होता. त्यानंतर तो विरारला जाऊन लपून बसला. ओळख लपवण्यासाठी त्याने एका सलूनमध्ये जाऊन दाढी व केस कापले होते. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने हे पाऊल उचललं ही बाबही त्याने पोलीस चौकशीत मान्य केली. मिहीर शाह हा शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे नेते राजेश शाह यांचा मुलगा आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button