ताज्या घडामोडीदेश-विदेश

ट्रक चालकाला पैशांसाठी पोलीस कर्मचाऱ्याकडून शिवीगाळ

पोलीस कर्मचाऱ्याची ट्रक चालकाकडे एक हजार रुपयांची मागणी

अहमदनगर : सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्र पोलीस राज्यभरामध्ये आपली सेवा देत आहे. परंतु काही पोलिसांना या ब्रीद वाक्याचा अर्थच कळला नाही की काय असं चित्र हल्ली पाहायला मिळत आहे. पैशांसाठी ट्रक चालकाला पोलीस कर्मचाऱ्याने शिवीगाळ करत केल्याचा धक्कादायक व्हिडिओ अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावातून समोर आला आहे. यामुळे आता ट्रक चालकांमधून संताप व्यक्त होत आहे. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई व्हावी, यासाठी ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने कोपरगाव शहर निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे अशा काही पोलीस कर्मचाऱ्यांमुळे पोलीस खात्याचे नाव बदनाम होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,सध्या वारकरी विठुरायाच्या दर्शनाला जात असल्याने नगर मनमाड महामार्गावरची अवजड वाहतूक जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या आदेशाने कोपरगाव शहरातील पुणतांबा फाट्यावरून वळविण्यात आली आहे. या ठिकाणी बॅरिकेट उभे करून पोलीस कर्मचारी उभे असतात. गुरुवारी शहर पोलीस ठाण्याचा कर्मचारी एस एस काठे पुणतांबा फाटा येथे ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी उभे होते. तेथे बन्सीलाल म्हणून एक परप्रांतीय ट्रक चालक आपले वाहन घेऊन आले. नगर मनमाड रस्त्यावरून मी जाऊ शकतो का? अशी विचारणा केली. त्यानंतर काठे नामक पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्याकडे एक हजार रुपयांची मागणी केली असल्याचे आरोप ट्रक चालकाने केले.

ट्रक चालकाने पाचशे रुपये देण्याची तयारी दर्शवली. मात्र संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने त्याला नकार देत चालक बन्सीलालच्या अंगावर धावून जात त्याला शिवीगाळ करून दांड्याने मारहाण केल्याचा प्रकार एका नागरिकाच्या मोबाईल कॅमेरात कैद झाला. काही क्षणात समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सध्या कोपरगाव शहरातील पुणतांबा फाटा आणि शिर्डी जवळ निमगाव बायपास वर अवजड वाहनांना प्रवेश बंदी असल्याने त्या ठिकाणी वाहने शिर्डीतून सोडण्यासाठी काही पोलिसांनी रात्रीच्या सुमारास काही ट्रक चालकांकडून खाजगी पंटरमार्फत चिरीमिरी घेण्याचे भानगडी सुरू केल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

अहमदनगर पोलीस दलातील अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत असून काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार कृतीमुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन होत आहे. या चौफुलांवर खाजगी पंटर कशासाठी लागतात, असाही प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात असून संबंधित ट्रक चालकाला मारहाण करणारा पोलीस कर्मचारी आणि त्याला साथ देणारा यांच्यावर देखील कारवाई व्हावी, अशीच अपेक्षा नागरिकांमधून देखील व्यक्त होत आहे. आता ही सर्व परिस्थिती पाहता अहमदनगरचे पोलीस अधीक्षक तसेच वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button