त्रिपुरात एनआरसी लागू करण्याचा प्रस्ताव नाही – केंद्राचा खुलासा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/nrc-6.jpg)
नवी दिल्ली- त्रिपुरात नॅशनल रजिस्ट्रेशन ऑफ सिटीझन (एनआरसी) योजना लागू करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव नाही असा खुलासा केंद्र सरकारतर्फे करण्यात आला आहे. विदेशी नागरीकांना हुडकून काढण्यासाठी या योजनेचा आधार घेतला जातो. आसाम मध्ये या प्रकारातून विदेशी नागरीकांचा शोध घेतला गेला होता. तशीच मोहीम त्रिपुरातही राबवावी अशी विविध घटकांची मागणी आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने हे स्पष्टीकरण दिले आहे.
नॅशनलिस्ट पार्टी ऑफ त्रिपुराच्या एका शिष्टमंडळाचे काल दिल्लीत गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेऊन ही मागणी केली होती. त्रिुपरातही विदेशी घुसखोरांची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्यांची पहाणी करण्याची गरज आहे असे निवेदन त्यांनी गृहमंत्र्यांना दिले आहे. पण त्यांना त्यावर कोणतेही आश्वासन देण्यात आलेले नाही असे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. त्रिपुरात एनआरसी लागू करण्याविषयी सरकारने अद्याप कोणताच विचार केलेला नाही असे यावेळी सांगण्यात आले. काल या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर केंद्र सरकारने त्रिपुरात एनआरसी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे अशी बातमी काही वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाली होती. त्या पार्श्वभूमीवर हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.