राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसंदर्भातील सर्वात मोठी बातमी!
![The revised pension scheme will be implemented from March 1 to the government employees in the state](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Eknath-Shinde-1-1-780x470.jpg)
मुंबई | गेल्या काही महिन्यांपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शन योजनेसंदर्भातील काही मागण्यांकडे सातत्याने प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं. त्याच धर्तीवर आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार राज्यातील सरकारी सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना १ मार्चपासून सुधारित पेन्शन योजना लागू होणार आहे.
सदर प्रकरणी राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे प्रतिनिधी आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. या बैठकीत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य शासनाच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनासुद्धा ४ टक्के महागाई भत्तावाढ देण्यासंदर्भात मंजुरी मिळणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
हेही वाचा – ‘मोफत शिक्षण देऊ म्हणून महाराष्ट्रातील विद्यार्थिनींना चंद्रकांत पाटलांनी फसवले’; काशिनाथ नखाते
पेन्शन योजनेसंदर्भातील या निर्णयानंतर येत्या काळात शासकीय आदेश पारित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी दिली. याच धर्तीवर येत्या काळात पेन्शनसंदर्भातील अधिसूचना जारी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसंदर्भातील या निर्णयानंतर आता त्याचा थेट फायदा ८ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना होणार आहे.