बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी, तर दहावीची १ मार्चपासून
राज्यमंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळपत्रक जाहीर झाले असून यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर फिरणारे संदेश, प्रवेश परीक्षांची जाहीर झालेली वेळापत्रके यांमुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखांबाबत उत्सुकता वाढली होती. अखेर मंडळाने संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदा बारावीच्या नियमित अभ्यासक्रमाच्या सर्व शाखा, द्विलक्षी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून या दिवशी इंग्रजी विषयाची परीक्षा आहे.
बारावीची परीक्षा २० मार्चपर्यंत चालणार आहे. दहावीची नव्या आणि जुन्या अभ्यासक्रमाची परीक्षा १ मार्चपासून सुरू होत असून २२ मार्चपर्यंत चालणार आहे. भाषा, विज्ञान, गणित, समाजशास्त्र अशा महत्त्वाच्या सर्व विषयांच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना एका दिवसाची सुट्टी मिळणार आहे. वेळपत्रक राज्यमंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याबाबत काही आक्षेप असल्यास पंधरा दिवसांच्या कालावधीत मंडळाकडे आक्षेप पाठवायचे आहेत.