‘पराभवाचे खापर आमच्यावर नको’; ऑर्गनायझरमधील लेखावर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया
![Chief spokesperson of Ajit Pawar group Umesh Patil said that we should not worry about defeat](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Ajit-Pawar--780x470.jpg)
मुंबई | अजित पवारांना बरोबर घेऊन भाजपाने स्वतःची किंमत केली, अशा प्रकारची टीका राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर या साप्ताहिकातून करण्यात आली होती. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावरून विविध राजकीय प्रतिक्रियादेखील उमटू लागल्या आहेत. दरम्यान, यावरून आता राष्ट्रवादी अजित पवार गटाने प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले, अपशय आल्यानंतर अनेक कारणे शोधली जातात. आरोप-प्रत्योराप होत असतात. ऑर्गनायझरमध्ये आलेल्या लेखाशी भाजपचे नेतृत्व सहमती दाखवणार नाही. पराभवाचा ठपका राष्ट्रवादीवर ठेवता येणार नाही. आमची महायुती ही दिर्घकाळाची आहे. त्यामुळे अजित पवार हे भाजपबरोबर यापुढेही असतील. आता आमचे लक्ष विधानसभा निवडणूक आहे. महायुतीमध्ये कोणताही वाद नाही, मतभेद नाही. झालेल्या चुका विधानसभा निवडणुकीत सुधारल्या जातील. मतभेदाचे निराकरण केले जाईल.
हेही वाचा – लोकसभेत सुनेत्रा पवारांचा पराभव का झाला? विजय शिवतारेंनी सांगितलं कारण..
राष्ट्रवादीसंदर्भात संभ्रम पसरवला जातो आहे. मी दिल्लीत होतो, मात्र आमच्यामुळे महायुतीचा पराभव झाला, असे भाजपचे कोणी म्हणाले नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर अजित पवार राज्यव्यापी दौरा करणार आहेत. यावेळी काहींना सहानुभूती मिळाली पण, ती अधिक काळ राहात नसते, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले.