सुनेत्रा पवार राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार?, रात्री उशिरा झालेल्या बैठकीत नाव फायनल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/mahaenews-13-780x470.jpg)
Ajit Pawar : राज्यसभेची उमेदवारी दाखल करण्याचा गुरुवारचा शेवटचा दिवस आहे. बुधवारपासून सुनेत्रा पवार यांचं नाव राज्यसभेसाठी घेतलं जात होतं. अखेर सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती असून रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली, त्या बैठकीत त्यांचं नाव निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे.
गुरुवारी दुपारी सुनेत्रा पवार राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशी माहिती आहे. बारामती मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची भरपाई करण्यासाठी सुनेत्रा पवार यांना राज्यसभा दिली जात असल्याचं सांगितलं जातंय.
बुधवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची एक बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती आहे. पराभवामुळे खचून गेलेल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढावं आणि केंद्रीय योजनांचा थेट फायदा मतदारसंघासाठी व्हावा, यासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे आल्याचं राजकीय जाणकार सांगतात.
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सुनेत्रा पवार यांना केंद्रीय मंत्रिपदाची संधी मिळू शकते, अशीही एक शक्यता आहे. नुकत्यात झालेल्या शपथविधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एकही मंत्रिपद मिळालेलं नव्हतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कॅबिनेट मंत्रिपदावर ठाम होता आणि भाजपकडून राज्यमंत्रिपदाची ऑफर होती, यामुळे मंत्रिपद घेतलं नसल्याचं पुढे आलेलं होतं. याशिवाय प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यातील संघर्षामुळे पक्षाने मंत्रिपद घेतलं नसल्याचंही बोललं जात होतं.