NEET परीक्षेवरून राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/mahaenews-2024-06-09T144716.482-780x470.jpg)
Rahul Gandhi On NEET Exam Scam | वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या संधीसाठी आवश्यक असणाऱ्या नीट परीक्षेचे निकाल लागले आहेत. परंतु, त्याच्यामध्ये अनेक संशयास्पद पद्धतीचे गुण दिलेले आहेत. ५ हजार केंद्रांवर साधारणपणे २४ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, त्यामध्ये जवळपास ६७ मुलांना टॉप ठरवण्यात आले, सर्वांना ७२० गुण दिले गेले आहेत. त्यातील सहा विद्यार्थी एकाच केंद्रातील आहेत. तसेच काही मुलांना ग्रेसमार्क दिले गेले आहेत.
या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने घेतलेल्या नीट परीक्षेमधील निकाल हे संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत आणि इतर राज्यातील मुलांना चांगले गुण दिले गेल्यामुळे महाराष्ट्रातील मुलांवरही अन्याय होणार आहे. विविध राज्यांमध्ये या स्पर्धा परीक्षा म्हणजे भ्रष्टाचाराचे ठिकाण ठरत आहेत. या संपूर्ण प्रकरणावरुन राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा – ‘आता माझ्या कंपन्या भारतात गुंतवणूक करणार…’, इलॉन मस्क यांनी मोदींच्या विजयाबद्दल अभिनंदन केली मोठी ‘घोषणा’
राहुल गांधी यांनी ट्वीट करत लिहिले की, “नरेंद्र मोदींनी अद्याप शपथही घेतली नाही आणि NEET परीक्षेतील हेराफेरीने २४ लाखांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त केले आहे. एकाच परीक्षा केंद्रातील ६ विद्यार्थी सर्वाधिक गुण मिळवून अव्वल, किती जणांना असे गुण मिळाले जे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही, परंतु सरकार सातत्याने पेपर फुटण्याची शक्यता नाकारत आहे.”
पुढे त्यांनी म्हंटले की, “शिक्षण माफिया आणि सरकारी यंत्रणा यांच्या संगनमताने सुरू असलेल्या या ‘पेपर लीक इंडस्ट्री’ला तोंड देण्यासाठी काँग्रेसने ठोस योजना आखली होती. आमच्या जाहीरनाम्यात कायदा करून विद्यार्थ्यांना पेपरफुटीपासून मुक्त करण्याचा संकल्प केला होता. आज मी देशातील सर्व विद्यार्थ्यांना आश्वासन देतो की मी संसदेत तुमचा आवाज बनेन आणि तुमच्या भविष्याशी संबंधित मुद्दे मांडेन. तरुणांनी INDIA वर विश्वास व्यक्त केला आहे. INDIA त्यांचा आवाज कधीही दाबू देणार नाही,” असे आश्वासन राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांना दिले.