अरविंद केजरीवाल करणार सरेंडर; ५ जूनला होणार सुनावणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/mahaenews-83-780x470.jpg)
Arvind Kejriwal : दिल्ली मद्य धोरणाशी संबंधित मनि लॉंडरिंग प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. अंतरिम जामीनाची मुदत आणखी सात दिवसांसाठी वाढवण्यात यावी अशी याचिका केजरीवाल यांनी दाखल केली होती.
मात्र राउज ॲव्हेन्यू न्यायालयाने त्यांना दिलासा दिला नाही. त्यामुळे केजरीवाल यांना अगोदरच्या आदेशाप्रमाणेच उद्याच तुरूंगात परत जावे लागणार आहे. त्यांच्या याचिकेवर ५ जून रोजी सुनावणी घेतली जाईल.
ईडीने केजरीवाल यांच्या याचिकेला विरोध करताना न्यायालयाला सांगितले की केजरीवाल यांनी तथ्य लपवले असून आपल्या आरोग्यासह अनेक मुद्द्यांवर चुकीची माहिती दिली आहे. तर केजरीवालांचे वकिल म्हणाले की केजरीवाल आजारी आहेत व त्यांना उपचारांची गरज आहे.
ईडीची बाजू मांडताना सॉलिसीटर जनरल तुषार मेहता म्हणाले की आरोग्य तपासणी आणि चाचण्या करण्याऐवजी केजरीवाल सगळीकडे प्रचारसभा घेत होते. याचा अर्थ सात किलो वजन कमी झाल्याचा केजरीवाल यांचा दावा चुकीचा आहे.
उलट त्यांचे एक किलो वजन वाढले आहे. यावर जो व्यक्ती आजारी आहे अथवा ज्याची आरोग्य स्थिती चांगली नाही त्याला कोणतेच उपचार दिले जाऊ नयेत असे ईडीला म्हणायचे आहे का असा सवाल केजरीवाल यांचे वकिल हरिहरन यांनी केला.
दोन दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीनेही केजरीवाल यांची याचिका तातडीने सुनावणीसाठी घेण्याकरता सूचिबध्द करण्यास नकार दिला होता.