Ground Report: भोसरी मतदार संघात महायुतीचा बोलबाला!; महाविकास आघाडीला बूथवर कार्यकर्ते मिळेना!
यंत्रणेअभावी मतदान केंद्रावर मविआची तारांबळ : मोदींच्या ‘गॅरंटी’मुळे मतदारांचा ‘घड्याळ’कडे कल
![Ground Report: Mahayuti in power in Bhosari Constituency!; Mahavikas Aghadi did not get workers on the booth!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/Mahesh-Landge-2-780x470.jpg)
पुणे । विशेष प्रतिनिधी
शिवसेना उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी शरद पवार या दोन्ही पक्षांची मोठी ताकद असतानाही यंत्रणेअभावी भोसरी विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडी ‘निष्प्रभ’ झाली आहे. अपवाद ८ ते १० बूथ वगळता सर्व ठिकाणी बूथ लावण्यासाठीसुद्धा ‘मविआ’ ची तारांबळ उडालेली पहायला मिळते. परिणामी, शिरुर लोकसभा मतदार संघात निर्णायक असलेल्या या विधानसभा क्षेत्रात महायुतीचा बोलबाला दिसत आहे.
विशेष म्हणजे, देशभरामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे होणारे ‘ब्रँडिंग’ आणि ‘मोदींची गॅरंटी’ची प्रचार यामुळे मतदारांचा कल हा महायुतीचे उमेदवार म्हणून ‘घड्याळ’कडे असल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीकडे पोलींग एजंटचीही वानवा असून, महायुती मात्र बूथ यंत्रणेवर सक्षमपणे काम करीत असल्याचे दिसते.
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात एकूण ११ मतदार संघांमध्ये आज मतदान पार पडत आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ, पुणे आणि शिरुर अशा तीन मतदार संघासाठी चुरस लागली आहे. शिरुरमधून महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे आमने-सामने आहेत.
महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर राज्यातील बदलेली राजकीय परिस्थिती आणि शिवसेना व राष्ट्रवादीतील फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या प्रति असलेली सहानुभूती यामुळे महाविकास आघाडीला राज्यात आणि पुणे जिल्ह्यात फायदा होईल, असा दावा केला जात आहे. पण, प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली यंत्रणा अपुरी पडत असल्यामुळे ‘मविआ’चे जहाज भरकडलेल्या अवस्थेत आहे.
भोसरी विधानसभा मतदार संघाचा विचार करता महायुतीच्या माध्यमातून आढळराव पाटील यांच्यासाठी अचूक नियोजन केलेले दिसते. मतदान केंद्रांवर ‘मविआ’कडून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट, कुणाल तापकीर, सचिन सानप यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे इम्रान शेख अशी मोजकी मंडळी स्वत:च बूथवर काम करताना दिसते. अन्य ठिकाणी मविआचे बूथसुद्धा नाहीत.
आढळराव पाटील यांची ‘बारी’ होणार!
गत निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांना आस्मान दाखवले आणि ‘जायंट किलर’ ठरले होते. मात्र, यावेळी राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. शिरुर लोकसभेतील भोसरी, खेड, जुन्नर, शिरूर, आंबेगाव आणि हडपसर अशा सहापैकी ५ मतदार संघात महायुतीचे आमदार आहेत. तसेच, महायुतीमधील भाजपा, राष्ट्रवादी यांची ताकद मोठी आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्यासाठी ही निवडणूक आव्हानात्मक होती. परंतु, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सहानुभूतीमुळे कोल्हे यशस्वी होतील, असा दावा केला जात होता. मात्र, निवडणूक प्रकियेमध्ये मतदान केंद्रावरील बूथ नियोजनात ‘मविआ’ची ताकद कमी पडली आहे. त्यामुळे यावेळी आढळराव पाटील यांची ‘बारी’ बसणार, असा ग्राऊंड रिपोर्ट आहे.