प्रचारतोफा थंडावल्या; राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघांसाठी सोमवारी मतदान होणार
पुणे, शिरुर, मावळसह राज्यातील 'या' ११ मतदारसंघांत उद्या मतदान
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार अशा प्रमुख नेत्यांच्या सभा आणि प्रचार दौऱ्यांनी पुणे, शिरूर आणि मावळ या तीन लोकसभा मतदारसंघातील प्रचाराची शनिवारी सांगता झाली. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्वच नेत्यांकडून एकमेकांवर आरोपाच्या फैरी कायम राहिल्या असून उद्या, सोमवारी या तिन्ही मतदारसंघांसह राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे.
राज्यातील मराठवाडा-विदर्भातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सर्वच प्रमुख नेत्यांनी चौथ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यासह आजूबाजूच्या लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले होते. बारामतीची लोकसभा निवडणूक झाल्यावर शरद पवार यांनीही शिरूर आणि मावळमध्ये प्रचारसभा घेतल्या होत्या. शुक्रवारी अचानक आलेल्या वळवाच्या पावसामुळे काही सभा-रोड शो रद्द झाल्याने शनिवारी बऱ्याच नेत्यांनी सकाळी आणि दुपारी तीन-चारपर्यंतच प्रचारसभा घेतल्या.
प्रशासकीय सज्जता
पुण्यातील तिन्ही मतदारसंघांमध्ये २० लाखांपेक्षा अधिक मतदार असून सोमवारच्या (१३ मे) मतदानासाठी सर्व प्रशासकीय प्रक्रिया सज्ज झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली. मावळ आणि शिरूर या दोन्ही मतदारसंघात २५ लाखांहून अधिक मतदार आहेत, तर पुण्याची मतदारसंख्या २० लाख आहे.