युपीआय व्यवहारांवरही निवडणूक आयोगाची करडी नजर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Untitled-design-22-1-780x470.jpg)
पिंपरी : बदलत्या काळात साड्या अथवा अन्य स्वरुपात मतदारांना वस्तूंचे वापट करणे अथवा युपीआय सारख्या ऑनलाईन पद्धतीने पैशांचे वाटप करून मतदारांना आकर्षित करण्याची शक्यता लक्षात घेत निवडणूक आयोगाने आता युपीआय व्यवहारांवर देखील करडी नजर ठेवली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यासाठी नियुक्त केलेले विशेष निवडणूक निरीक्षक धर्मेंद्र एस गंगवार आणि विशेष निवडणूक पोलीस निरीक्षक एस के मिश्रा यांनी नुकताच पुणे जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेतला. त्यात त्यांनी युपीआय व्यवहारांबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.
हेही वाचा – “एकनाथ खडसें नंतर आता रोहिणी खडसेंनाही भाजपमध्ये आणणार”; रक्षा खडसेंचे मोठे विधान
संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची संख्या घटत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आवश्यक त्या मतदान केंद्रांवर केंद्रीय सशस्त्र पोलीस बलाची सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात यावी. कायदा व सुव्यवस्था सांभाळताना संयमाने कार्यवाही करावी. निवडणुकीत केवळ रोकड वाहतुकीवर लक्ष न ठेवता वस्तू वाटप आणि युपीआय माध्यमातून मतदारांना प्रभोलभ दिले जाते का, याबाबत लक्ष द्यावे. सोशल मिडियावरून चुकीची माहिती अथवा अफवा पसरवल्या जातात का, याबाबत देखील खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
निवडणूक आयोगाने सर्वच बँक खात्यांवर नजर ठेवली आहे. एखाद्या खात्यातून दहा लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम काढली गेली तर त्याबाबत बँकेकडून आयकर विभागामार्फत थेट निवडणूक आयोगाला माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर संबंधितांना त्या रकमेचा हिशोब निवडणूक आयोगाला द्यावा लागेल.