पुणे शहरात पुन्हा गोळीबार, दोन दिवसांत ३ गोळीबाराच्या घटना
![3 incidents of firing in last two days in Pune](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Pune-Firing-780x470.jpg)
पुणे | शहरात गेल्या दोन दिवसांत तीन गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. गुंडाच्या झाडाझडतीनंतर शहरात गोळीबार झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनांमुळे आता पुणे शहराच्या कायदा सुवव्यस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
सिंहगड पोलीस ठाणे हद्दीतील भूमकर चौकात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. गणेश गायडवाड (रा. वारजे) याच्यावर गोळीबार झाला आहे. त्याच्या खांद्याला गोळी लागली आहे. आज पहाटे अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. माचीस मागीतल्याच्या कारणातून वाद झाला असल्याची माहिती मिळत आहे. पुण्यात आर्म ऍक्टचे गुन्हे दाखल असणार्या गुन्हेगारांची परेड मंगळवारी पुणे पोलिसांनी घेतली. अनेकांना पोलीस आयुक्तालयात बोलावलं होतं. त्यांना शहरात गोळीबाराच्या घटना झाल्या नाही पाहिजे, अशी सक्त ताकीद दिली जात असतानाच जंगली महाराज रस्त्यावर गोळीबार झाला. हे प्रकरण संपत नाही, तोपर्यंतच भल्या सकाळी दुसरी गोळीबाराची घटना घडली आहे.
हेही वाचा – ‘सोलापूर कमी, माढ्याची जागा भाजपसाठी कठीण’; चंद्रकांत पाटलांची कबुली
जंगली महाराज रस्त्यावर मंगळवारी दुपारी पावने तीन वाजताच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका बांधकाम व्यवसायिकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने गोळी न झाडली गेल्यामुळे व्यवसायिकाचे प्राण वाचले. तर, दुसर्या घटनेत हडपसर शेवाळेवाडी येथे व्यवसायिक स्पर्धेतून एका माजी सैनिकाने दुसर्या माजी सैनिकावर गोळीबार केला. त्यामध्ये एकजण जखमी झाला आहे. शहरातील रेकॉर्डवर असलेल्या बंदूकबाजांची पोलीस आयुक्तालयात बोलवून परेड घेतली. त्यांना दम भरुन तंबी दिली. त्यानंतर गोळीबाराच्या या दोन घटना घडल्या आहेत.