भाजपाला मोठा धक्का! धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार?
![The Dhairyasheel Mohite Patil will join the Sharad Pawar group](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Dhairyasheel-Mohite-Patil-780x470.jpg)
पुणे | लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला एक मोठा धक्का बसला आहे. भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपा सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे त्यांना १० एप्रिल रोजी राजीनामा पत्र पाठवले होते. भाजप सोडल्यानंतर मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.
धैर्यशील मोहिते पाटील यांनी काय म्हटलं?
मी भारतीय जनता पार्टी, सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच माळशिरस विधानसभा निवडणूक प्रमुख पदाची माझ्याकडे जबाबदारी आहे. या कार्यकाळात जिल्हा, मंडळ कार्यकारिणी, मोर्चा, प्रकोष्ठ इत्यादी संघटना रचना गठीत करुन कार्यान्वित करण्याचं कार्य केलं. तसंच शक्तीकेंद्र, सुपर वॉरीयर, बूथ रचनाही सक्रिय केल्या. वेळोवेळी विविध कार्यक्रम आयोजित करुन संघटना व बूथच्या माध्यममातून जनसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे कार्य केले.
हेही वाचा – मावळ विधानसभा मतदारसंघातील साडेतीन हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
आपण माझ्यावर दाखवलेला विश्वास व दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो व आपणांस कळवू इच्छितो की मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदांचा, तसेच भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, त्याचा स्वीकार व्हावा ही विनंती, आपला धैर्यशील मोहिते पाटील, असं राजीनामा पत्र धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना उद्देशून लिहिलं आहे.