Pune | राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील बिबट्या पळाला, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
पुणे | कात्रज भागातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेला बिबट्या पिंजऱ्यातून पळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. बिबट्या पळाल्याची माहिती मिळताच त्याचा संग्रहालय प्रशासनाकडून शोध घेण्यात येत आहे. मात्र दिवसभरात शोध घेवून तो सापडला नसल्याने प्राणी संग्रहालय प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात असून त्यांच्यावर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
राजीव गांधी प्राणी संग्रहालय कात्रज परिसरात आहे. हा बिबट्या पळाल्याने या परिसरांत राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक नागरिकांकडून बिबटा कुठे गेला?, असे प्रश्न विचारले जात आहे. शिवाय राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या आवारात नागरिकांनी गर्दीदेखील केली आहे. मात्र या आवारात गर्दी करु नये, असं आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा – ‘मावळवर पुन्हा भगवा फडकवणार’; उद्धव ठाकरे
कात्रज प्राणी संग्रहालयात तीन मादी आणि एक नर जातीचा बिबट्या आहे. त्यामधील नर जातीचा बिबट्या पसार झाला आहे. प्राण्यांच्या अदलाबदली कार्यक्रमांतर्गत हा बिबट्या कर्नाटकमधील हंपी येथून आणण्यात आला होता. प्राणी संग्रहालयातील प्राण्यांच्या अनाथालयात काही दिवसांपासून त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले होते. मात्र, सोमवारी सकाळी सुमारे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बिबच्या पसार झाल्याचे संग्रहालयातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर पिंजऱ्याच्या लोखंडी सळाया वाकवून तो प्रसार झाल्याचे प्रथमदर्शनी प्राथमिक माहितीवर कर्मचाऱ्यांनी सांगितले. परंतु हा बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातच आहे, की बाहेर गेला याचा तपास अद्याप प्रशासनाला लागला नाही. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे.