…अन् महापौर राहूल जाधव यांना पाहून “बाई” गहिवरल्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/42521879_334535157308704_942207939458891776_o.jpg)
पिंपरी (महा ई न्यूज) – महापौर राहूल जाधव यांचा शाळांना भेटी देण्याचा दौरा सुरू आहे. दररोज एका शाळेला भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांची व शाळेतील स्थितीचा ते आढावा घेत आहेत. मंगळवारी (दि. 25) अचानक त्यांनी आपल्याच प्रभागातील चिखलीच्या साई जीवन विद्यामंदीर शाळेला भेट दिली. साक्षात महापौर जाधव यांना पाहून शाळेच्या मुख्याध्यापिका गहिवरल्या. त्यांना आनंदाश्रृ अनावर झाले. त्यातच महापौर राहूल जाधव यांनी त्यांचे चरणस्पर्श केल्यानंतर बाईंच्या डोळ्यात आश्रृ तरळले. कारण, ज्या बाईंनी राहूल जाधव यांना घडवले. ते महापौर म्हणून साक्षात त्यांच्यासमोर उभे राहिल्याने बाईंच्या डोळ्यासमोर विद्यार्थी दशेतील राहूल जाधव उभा राहिला. त्यामुळे बाईंना गरिवरून आले. त्यानंतर जाधव आणि मुख्याध्यापिका बाईंनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेण्यासाठी महापौर जाधव यांनी प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी महापौर पदाची सुत्रे हाती आल्यानंतर काही दिवसांतच दररोज एका पालिकेच्या शाळेला भेट देऊन तेथील स्थितीचा आढावा ते घेत आहेत. विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शिक्षकांची उपस्थिती, शैक्षणिक पध्दती, क्रीडांगण, शालेय साहित्याचा पुरवठा आदी गोष्टींचा ते जातीने आढावा घेत आहे. मंगळवारी मात्र, त्यांनी आपण पहिले ते सातवी पर्यंत ज्या शाळेत शिकलो, त्या चिखलीतील साई जीवन विद्यामंदीर शाळेचा भेट दिली. या शाळेचे नाव पूर्वी जीवन शिक्षण विद्यामंदीर असे होते. शाळेतील शिक्षकांच्या भेटी घेऊन अडीअडचणींवर चर्चा केली. मुख्याध्यापिका माधुरी इनामदार यांच्यासोबत जुन्या आठवणींना उजाळा दिला.